Sunday, September 20, 2020

पालकमंत्र्यांकडून सा. प्र. वि. च्या कामकाजाचा आढावा

 




पालकमंत्र्यांकडून सा. प्र. वि. च्या कामकाजाचा आढावा

पायाभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करावी

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 20 :  जिल्ह्यातील रस्ते, पूल व इमारतींची जिल्ह्यात सुरू असलेली कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व विहित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी आज घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा व विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना साथीच्या संकटकाळात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होत असताना विकासालाही गती मिळावी या उद्देशाने पायाभूत सुविधांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. त्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्ण करण्याचे नियोजनाबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात प्रस्तावित कामे नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.  कामांची गुणवत्ता व दर्जा उत्तम असावा. जिल्ह्याच्या रस्तेविकासात कुठेही अडथळा येता कामा नये.

मेळघाटातील रस्तेविकासाकडे प्राधान्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन मेळघाटातील रस्तेविकासाची प्रलंबित कामे व वनविभागाकडून आवश्यक परवानगी याबाबत मंत्रालय स्तरावर बैठक होऊन परवानगी प्रक्रियेबाबत तत्काळ कार्यवाहीसाठी निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम प्रशासनाने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून कामे मार्गी लावावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.   

पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे उभारून विकासाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे. जिल्ह्यात हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत कामेही विहित वेळेत पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यापूर्वी हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत सुमारे पाचशे कोटी रूपयांचा निधीतून महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामेही नियोजित वेळेत पूर्ण करावीत. आवश्यक कामांसाठी निधी मिळवून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

कोरोना संकटकाळ, लॉकडाऊन आदींमुळे उर्वरित कामांमध्ये काहीसे अडथळे आले. मात्र, त्या कामांना गती देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्तेविकास उपक्रमाला गती मिळण्यासाठी यापूर्वीही वेळोवेळी आढावा घेतला गेला आहे. त्यामुळे नियोजनानुसार रस्ते, पूल व इमारतीची कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

 प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ता रूंदीकरणाची कामे  व नियोजित कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.

 

 

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...