Tuesday, September 15, 2020

 








महाविद्यालयीन परीक्षा नियोजनाबाबत उच्च शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

शासन, प्रशासन, विद्यापीठाच्या समन्वयाने परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडणार

                     -  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

अमरावती, दि. 15 : महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठांकडून परिपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षेबाबत साधनांची अडचण असणा-या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व निर्धोक वातावरणात ऑफलाईन परीक्षेचे नियोजन प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येत आहे. शासन, प्रशासन व विद्यापीठ यांच्या समन्वयाने परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

 

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आढावा बैठक विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

            महाविद्यालयीन परीक्षा प्रक्रियेच्या अनुषंगाने आपण सर्व विद्यापीठातील नियोजनाचा आढावा घेत असल्याचे सांगून श्री. सामंत म्हणाले की,  कोरोना महासंकटात सर्वच क्षेत्रांत अनेक अडचणी उभ्या राहिल्या असताना शासनाकडून विविध निर्णयांच्या अंमलबजावणीतून त्यावर मात करण्याचा प्रयत्न होत आहे. याच अनुषंगाने परीक्षा प्रक्रियेत येणा-या अडचणी, पूर्वतयारी व आवश्यक सहकार्य यासाठी विद्यापीठनिहाय आढावा बैठक घेतली जात आहे. या अनुषंगाने विद्यापीठासमोरील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचाही प्रयत्न होत आहे. विद्यापीठांचे शासन स्तरावर जे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते सर्वांच्या उपस्थितीत अशा आढाव्याद्वारे एकाच दिवसात सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठकीचेही नियोजन करण्यात येईल. सर्व प्रलंबित प्रश्न शासन, प्रशासन व विद्यापीठाच्या समन्वयातून सोडविण्यात येतील, असेही ते म्हणाले.

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून सुमारे 70 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात 15 ते 25 सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक व 1 ते 26 ऑक्टोबरदरम्यान अंतिम परीक्षा होणार असून, मॉकटेस्टचाही अंतर्भाव असेल. परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर व्हावेत, यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यात 90 ते 92 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार असून, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी स्वच्छता, सोशल डिस्टन्स आदी आवश्यक बाबींची काळजी घेतली जाईल. जिल्हा प्रशासनाने या प्रक्रियेसाठी संपूर्णत: सहकार्य करावे, असे निर्देश उच्च शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विद्यापीठाचे खूप सहकार्य मिळत आहे. विशेषत: विद्यापीठात लॅब स्थापित होऊन कोरोनाचे अहवाल वेळेत मिळायला सुरुवात झाली व प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती मिळाली. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल.

 

     ऑनलाईन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती त्यांच्या महाविद्यालयाकडून 22 तारखेपर्यंत संकलित करून 25 तारखेपर्यंत विद्यापीठाला कळविण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून ऑफलाईन परीक्षाही घेतली जाईल, असे विद्यापीठाचे परीक्षा विभागप्रमुख श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. बैठकीनंतर मंत्री श्री. सामंत यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.

 

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...