आता ग्रामीण भागातही गृह विलगीकरणाची परवानगी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

कोरोना प्रतिबंध उपाययोजना


आता ग्रामीण भागातही गृह विलगीकरणाची परवानगी

-  जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

अमरावती, दि. 7 :  शहरापाठोपाठ आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इच्छूक कोरोनाबाधित रूग्णांनाही गृह विलगीकरणासाठी परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना श्री. नवाल म्हणाले की, केंद्र शासनाने रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार दि. एक ऑगस्टपासून प्रथमत: महापालिकेच्या क्षेत्रात इच्छूक रूग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास परवानगीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आता ग्रामीण भागातही रूग्ण आढळल्यास व त्यांच्यात लक्षणे नसतील तर त्यांना गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात येईल. तालुका आरोग्य अधिकारी हे त्यासाठी परवानगी प्राधिकारी असतील. त्याचप्रमाणे, ग्रामस्तरीय कोविड नियंत्रण समितीच्या सूचनाही या प्रक्रियेत विचारात घेतल्या जातील. ग्रामस्तरावरील  आशा स्वयंसेविका, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हेही अंमलबजावणी प्रक्रियेत सहभागी असतील.

इच्छूक रूग्णास सुरुवातीला दोन दिवस संस्थात्मक विलगीकरणात अर्थात कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. कुठलीही लक्षणे न आढळल्यास गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात येईल. मात्र, रुग्णाचे किमान चार खोल्यांचे घर व त्यात दोन बाथरूम अटॅच्ड खोल्या असणे आवश्यक आहे जेणेकरून रूग्णाला बाथरूमसह स्वतंत्र खोली राहण्यासाठी व उपचारासाठी वापरता येईल व इतर कुटुंबियांचीही सुरक्षितता जपली जाईल. गृह विलगीकरणासाठीचे सर्व नियमांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक असेल.

ते पुढे म्हणाले की,  अनलॉकिंगच्या प्रक्रिया विविध व्यवसाय व सेवांना परवानगी दिली जात असताना कोरोना नियंत्रणाची आपली सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे स्वच्छता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्स यांचा कसोशीने वापर केला पाहिजे. मास्क लावला नाही तर व्हेटिंलेटर लावायची वेळ येईल. त्यामुळे सर्वांनीच आत्मनियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा रुग्णात लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे आपण जर कुणा रूग्णाच्या संपर्कात आलेलो असू, तर तत्काळ तपासणी करून घेणे आवश्यक आहे. बेपर्वा राहून आपले कुटुंब आणि इतरांना जोखमीत टाकू नये. त्यामुळे दक्षता काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. जनजागरणासाठी व आरोग्य शिक्षणासाठी शासनाकडून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांत भर टाकण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. अतिदक्षता उपचार सुविधा बेडची संख्या सहाशेवर नेण्यात आली आहे. त्याशिवाय, विविध खासगी रूग्णालयांना उपचार सुविधांसाठी परवानगी देण्यात येत आहे. तसेच, हॉटेल्सनाही परवानगी देण्यात येत आहे. लिक्वीड ऑक्सिजनबाबतची अडचण लवकरच दूर होईल. त्यासाठी प्रयत्न होत आहेत. रूग्णसेवेसाठी आयटीआय परिसरात आणखी 100 बेडची सुविधा निर्माण करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती