Friday, September 18, 2020

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध निर्णय - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


आदिवासी क्षेत्रात सेवारत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ
आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध निर्णय

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 18:  दुर्गम भाग, आदिवासी क्षेत्रात सेवा देणा-या मानसेवी वैद्यकीय अधिका-यांचे मानधन चोवीस हजारांहून चाळीस हजार रूपये एवढे वाढविण्यात आले आहे. या निर्णयाचा लाभ मेळघाटसह जिल्ह्यातील दुर्गम, संवेदनशील भागात आरोग्य सेवा देण्याचे काम करणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे. भक्कम मनुष्यबळ, विविध अद्ययावत सुविधा याद्वारे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून विविध निर्णय अंमलात आणले जात आहेत, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात 'नवसंजीवनी'  योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन चोवीस हजारांवरुन थेट चाळीस हजार रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आदिवासी भागात 'नवसंजीवनी' योजनेंतर्गत मानसेवी  वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात, तसेच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात. हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागतील साधारण सहा ते दहा गावांना सेवा देतात. या दौऱ्यात ते बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करत असतात. मानसेवी आरोग्य अधिकारी हे पद कंत्राटी स्वरूपाचे असल्याने त्यांना इतर लाभ मिळत नाहीत. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.

      सध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेसाठी डॉक्टर, परिचारिका इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी अमूल्य योगदान मिळत आहे. मानसेवी वैद्यकीय अधिकारीही दुर्गम आदिवासी भागत आरोग्य सेवेसाठी तत्पर आहेत. राज्यातील आरोग्य विभागासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी सरकार तत्पर आहे, कोरोनामुळे सध्याची परिस्थिती कठीण आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत. रूग्णसेवेत कुठेही कसूर होता कामा नये, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

       कोरोना प्रतिबंधासाठी घरोघर तपासणी, आवश्यक उपचार व लोकशिक्षण यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम जिल्ह्यात सर्वदूर राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या अनुषंगाने कर्मचा-यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती गोळा करून नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करावी. नागरिकांनीही मोहिमेला सहकार्य करावे. सर्व प्रकारची माहिती द्यावी. कुठलीही माहिती लपवू नये. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी मोहिमेला सर्वांनी एकजूटीने साथ द्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

 

                                                00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...