Sunday, September 13, 2020

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’ 15 सप्टेंबरपासून

 



कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी साथ देण्याचे प्रशासनाचे आवाहन

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’ 15 सप्टेंबरपासून

मोहिमेतून एकही घर सुटता कामा नये  

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

* आरोग्य पथके देणार घरोघर भेट

* ताप व ऑक्सिजन लेव्हलची करणार तपासणी

* संशयितांचा शोध व उपचार

* आरोग्य शिक्षणाचीही तरतूद

 

अमरावती,दि. 13 : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात  राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात मंगळवारपासून(15सप्टेंबर) राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, एकही घर मोहिमेतून सुटता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

मोहिमेची पूर्वतयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कोरोनाचे नियंत्रणासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने कोरोनावर मात करू. या मोहिमेत नागरिकांनीही योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण् राज्यभर येत्या 15 सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक शहरातील, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणार आहेत. मोहिमेतून एकही घर सुटता कामा नये. नागरिकांनीही स्वयंसेवकांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी व कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले आहे.

लोकांना आरोग्य शिक्षण व महत्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रूग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी संदर्भ सेवा पुरविणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनीविकार,लठ्ठपणा व उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यातयेणार आहेत. यामुळे कोरोना रूग्णांच्या संपर्कात आालेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.ही मोहिम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुस-या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.  एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे.

 

आरोग्य पथकाला सहकार्य करावे : श्री. नवाल

 

            याबाबत जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण जिल्ह्यात ही मोहिम राबवली जात आहे. हाय रिस्क रूग्णांचा, तसेच संशयितांचा शोध घेणे व त्यांना योग्य उपचार मिळवून देणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

          अमरावती जिल्ह्यात यापूर्वी ‘चला अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ ही मोहिम चार टप्प्यात राबविण्यात येऊन 20 लाखांहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. आता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...