Wednesday, September 9, 2020



 अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देण्यासाठी प्रतीपालकत्व योजना 

 - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रायोगिक स्वरूपात राज्यातील पाच जिल्ह्यात अंमलबजावणी; अमरावतीचाही समावेश

 

अमरावती, दि. 9: अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे प्रतीपालकत्व योजना (फॉस्टर केअर) राबविण्यात येत असून, अमरावती जिल्ह्यासह राज्यातील पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. याबाबत जिल्ह्यात सर्वदूर माहिती पोहोचवून इच्छूक कुटुंबांचा सहभाग मिळवावा व अनाथ बालकांना सुरक्षित कुटुंब मिळवून द्यावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

 

महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बालगृहातील अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सुरक्षित कुंटुंब, घर मिळवून देणाऱ्या प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजना महिला व बालविकास विभागाकडून अंमलात आली आहे. अमरावती, पुणे, सोलापूर, पालघर, मुंबई उपनगर या पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत कुटुंबाने बालकांचा तात्पुरत्या स्वरूपात सांभाळ करणे अपेक्षित आहे. या मुलांच्या संगोपनासाठी प्रतीपालकत्व पालकांना दरमहा दोन हजार रूपये देण्यात येणार आहेत. योजनेत प्रत्येक जिल्ह्यात चाळीस मुलांची निवड करण्यात येणार आहे.

 

   अनाथ बालकांना घर मिळवून देण्याच्या कामाइतके दुसरे मोठे कार्य नाही. त्यामुळे प्रतीपालकत्व योजना महत्वपूर्ण आहे. मुलांना फॉस्टर केअरच्या माध्यमातून घर मिळवून दिले, योजनेची नीट अंमलबजावणी झाली तर उद्याची युवा पिढी मानसिक, शारीरिक तसेच सामाजिकदृष्ट्या सक्षम होईल. भविष्यातील भारत घडविण्याचे कार्य यातून होईल. त्यामुळे या योजनेत जिल्ह्यात सर्वदूर जाणीवजागृती करावी. कुटुंबात राहिल्याने मुलांचा सर्वांगीण विकास होतो हे लक्षात घेऊन ही योजना अंमलात आली आहे. योजनेच्या तयारीच्या अनुषंगाने या पाच जिल्ह्यातील सर्व बाल संरक्षण यंत्रणांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातही योजनेच्या यशस्वितेच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

 

 

 

प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजना

 

     बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ या कायद्याअंतर्गत अनाथ मुलांना महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बालगृहांमधे ठेवले जाते. कौटुंबिक वातावरणात राहण्याचा बालकांचा हक्क आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करता दत्तक आणि प्रतीपालकत्व प्रायोजकत्व हे संस्थाबाह्य पर्यायही उपलब्ध आहेत. दत्तक प्रक्रियेत कायमस्वरुपी पुर्नवसन होते. परंतु सर्वच बालकांची दत्तक प्रक्रिया होतेच असे नाही. अशावेळी या बालकांचे कायदेशीर पालकत्व न देता त्यांना बाल न्याय कायद्यान्वये प्रतीपालकत्व योजनेत प्रायोजित पालकत्व देता येते. प्रतीपालकत्व म्हणजे बालकाला पर्यायी काळजीसाठी प्रायोजकत्व आणि प्रतीपालकत्व मान्यता समितीने निवडलेल्या योग्य कौटुंबिक वातावरणात ठेवणे होय.

        प्रायोगिक अर्थात प्रतिपालकत्व स्वीकारून योजनेत भाग घेऊ इच्छिणारे पालक महिला व बालविकास आयुक्तालयाच्या https://wcdcommpune.org  या  संकेतस्थळावर अर्ज करू शकतील. या योजनेत सहभागी होणा-या इच्छूक कुटुंबाच्या निवडीचे निकष व कागदपत्रांची माहिती, अर्ज व सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...