कोरोना विरुध्दच्या लढाईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्वाची - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 





कोरोना विरुध्दच्या लढाईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्वाची

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

मास्क न लावणाऱ्यांना तीनशे रुपये दंड

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात जनजागृती करा

 

अमरावती, दि. 15 : कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच एक सोपा उपाय आहे. नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यावयाची काळजी याबाबत जिल्ह्यात दर्शनी बोर्ड, फ्लेक्स व हेल्थ लाईनच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कोरोना आजारा संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या . विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंग, पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन. , मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक रणमले, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. सोमवंशी आदी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, राज्यात सर्वत्र आजपासून (15 सप्टेंबर) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची कोरोना आजाराबाबत चौकशी, ताप व प्राणवायू पातळी तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात दोन हजारावर आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांची या आरोग्य पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात येणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच आवश्यक आहे. या पथकांव्दारे कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबतचे लोकशिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनीही घरी येणाऱ्या आरोग्य पथकांना कुठलीही माहिती न लपविता परिपूर्ण माहिती द्यावी व कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

            त्या पुढे म्हणाल्या की, कोरोनाच्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. द्रवरुप ऑक्सीजनचा तुटवडा भासू नये म्हणून नागपूर आणि भिलाई येथून दर दिवशी एक टँकर याप्रमाणे पुरवठा उपलब्ध होणार आहे. तश्याप्रकारचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.

            शहर पाठोपाठ ग्रामीण भागात सुध्दा कोरोना संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. ग्रामीण भागात संक्रमितांचा आकडा वाढू नये, यासाठी पंचायत समिती, नगरपालिका यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोना विषाणूपासून बचावाच्या उपाययोजना संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. गावात दर्शनी भागात डिस्प्ले बोर्डवर सूचना संदेश आदी लावण्यात यावेत. तालुका स्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील लोकांमध्ये कोरोना महामारी विषयी जनजागृती करावी.

            जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा, यासाठी शासकीय आयटीआय संस्था तसेच जिल्हा क्रिडा संकुल येथे शंभर खाटांचे सर्व सोयीयुक्त आयसोलेशन सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या या संकट काळात मास्क लावणे हे एकच शस्त्र सध्यातरी अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेत मास्क लावण्याची सवय अंगीकारावी. जे व्यक्ती मास्क लावणार नाहीत त्यांच्याकडून तीनशे रुपयेचा दंड वसूल करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांनी दिले आहेत. यानंतरही लोकांमध्ये मास्क लावल्याचे आढळून न आल्यास दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

            जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे.  एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक  प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. हाय रिस्क रूग्णांचा, तसेच संशयितांचा शोध घेणे व त्यांना योग्य उपचार मिळवून देणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे.

नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. आरोग्य पथकाला सहकार्य करावे. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन श्री. नवाल यांनी यावेळी केले.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती