Thursday, September 3, 2020

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट कौशल्य विकासासह रोजगार निर्मितीवर भर - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट

कौशल्यविकासासह रोजगारनिर्मितीवर भर

-   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 3 : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच एमसीव्हीसी प्रशिक्षण घेतलेल्या 70 विद्यार्थी आपल्या नव्या नोकरीसाठी बसने औरंगाबादला नुकतेच रवाना झाले. नव्या प्रशिक्षणार्थींना शिकाऊ उमेदवार म्हणून प्लेसमेंट मिळवून देण्यासाठी खास उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्यात एका हजारावर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.  

 

युवकांमध्ये कौशल्य विकास व रोजगारनिर्मितीवर शासनाकडून भर देण्यात येत आहे. शिकाऊंना योग्य रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशिक्षण संस्थांकडूनही उपक्रम राबवला जात आहे. त्याचप्रमाणे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फेही ऑनलाईन मेळाव्याच्या माध्यमातून इच्छूकांना रोजगार मिळत आहे.  या मेळाव्यांमुळे विविध कंपन्यांनाही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. भरीव रोजगारनिर्मिती, कुशल मनुष्यबळ उपलब्धता यातून विकासाला गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षणार्थींना शिकाऊ उमेदवार म्हणून प्लेसमेंट मिळवून देण्याच्या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

अमरावती जिल्ह्यामधून एमसीवीसी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी तसेच शासकीय आयटीआय महाविद्यालयामधील 70 विद्यार्थी औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन या कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून निवडण्यात आले. त्यात चाळीस मुली तसेच 30 मुलांचा सहभाग आहे. औरंगाबाद येथून आलेल्या धूत ट्रान्समिशनच्या दोन बसेसने शासकीय आयटीआय कॉलेज येथील हे प्रशिक्षणार्थी औरंगाबाद येथे जाण्याकरिता रवाना झाले.

 

या उपक्रमात एमसीव्हीसीच्या 467 विद्यार्थ्यांची तसेच आयटीआयच्या 627 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. लवकरच उर्वरित विद्यार्थीही औरंगाबादला रवाना होऊन आपल्या कामासाठी रूजू होतील, अशी माहिती जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी माननीय श्री  कमलाकर जी. विसाळे यांनी यावेळी दिली. त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या मंगलाताई देशमुख, सुनील वानखडे साहेब यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही विद्यार्थी व स्टाफला उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या उपक्रमामुळे सर्व शिक्षकांमध्ये तसेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व समाधान निर्माण झाले आहे.

 

त्याचप्रमाणे, कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार विभागातर्फे कुशल मनुष्यबळ विकास व रोजगारनिर्मितीसाठी  विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळात अनेक जण रोजगारापासून वंचित झाले. त्यामुळे पुन्हा स्थिती पूर्ववत करण्यासाठी व कोरोनाच्या आव्हानावर मात करुन सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन व्यापक प्रयत्न करित आहे. त्याच उद्देशाने नोकरीसाठी इच्छूक  असलेले उमेदवार आणि उद्योजकांमध्ये सांगड घालण्यासाठी महास्वयंम आणि महाजॉब्ससारखी संकेतस्थळे सुरु करण्यात आली आहेत. ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत.  उपक्रमात अधिकाधिक उद्योगांचा समावेश करून जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळवून द्यावा व ऑनलाईन मेळाव्यांत सातत्य ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.              

 

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...