मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही

याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

अमरावती, दि.27: जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र, प्रवर्गाचे अर्ज, शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासंदर्भांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. येत्या 15 दिवसात प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश श्रीमती कौर यांनी संबंधितांना दिले.

            जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी महाविद्यालय व विद्यार्थीस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांचा महाविद्यालयनिहाय आढावा घेतला. त्यानुसार पात्र नोंदणीकृत अर्जापैकी प्रलंबित अर्जांवर सर्व महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी. तसेच कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. तसेच येत्या 15 दिवसात प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी  दिले.

लॉगिनवर कोणतीही कार्यवाही न करता अर्ज प्रलंबित राहून पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू न देण्याची जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. यासाठी महाविद्यालयांनी वेळीच शिष्यवृत्तीच्या अर्जावर कार्यवाही करण्याची सूचना श्रीमती कौर यांनी यावेळी केली.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र, प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे नोंदणीकृत अर्ज प्राधान्याने भरून घेण्यात यावे. तसेच महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगारनिर्मितीसाठी मार्गदर्शन करणे तसेच ‘संवाद अभियान युवा संवाद, यासारखे कार्यक्रम सुरू करणे, महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्र स्थापन करण्यासंबंधी महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र भेलाऊ तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, शिष्यवृत्ती विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती