शासन पीडितांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभे आहे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 







शासन  पीडितांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभे आहे

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना केंद्र व राज्य शासनामार्फत ‘पीएम केअर फॉर

चिल्ड्रेन’व्दारे मदतीचे वाटप

संपूर्ण देशभर एकाचवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मदत निधीचे वितरण

अमरावती जिल्ह्यातील 15 बालकांना 2 कोटी 25 लक्ष रुपयांचा लाभ

            अमरावती, दि.30 : कोरोना आपत्तीमुळे अनेकांचे जीवन बदलले. या काळात ज्यांनी आपल्या परिवारातील सदस्य गमावले, त्यांचे दु:ख शब्दातीत आहे. परंतु परोपकाराची जाणीव असलेला आपला भारत देश आणि शासन यंत्रणा कोरोना पीडितांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभी आहे. यासाठी कोरोना पीडितांनी आपले मनोबल दृढ ठेवावे. तुम्हाला पुढील आयुष्य खंबीरतेने आणि यशस्वीपणे जगण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत आहे, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेव्दारे कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदतनिधी वितरण कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पार पडला, त्यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.  हा कार्यक्रम संपूर्ण देशभर एकाचवेळी आयोजित करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात महिला व बाल कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल, महिला व बाल विकास उपायुक्त सुनील शिंगणे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, बाल कल्याण समिती सदस्य अंजली घुलक्षे, महावीर वासनिक, ॲड. उज्ज्वला श्रीराव, विधी अधिकारी ॲड. सीमा भाकरे आदी संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ऑनलाईन मार्गदर्शन करतांना श्री. मोदी म्हणाले की, पालक गमावलेल्या बालकांच्या दु:खाची भरपाई होऊ शकत नाही. परंतु आलेल्या संकटासमोर हतबल न होता स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. शासन सदैव आपल्या पाठीशी आहे. अशा बालकांचे शिक्षण, आरोग्य व निवाऱ्याची व्यवस्था शासन करीत आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करुन शासनाने ही योजना आणली आहे. बालकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय नातेवाईक व शिक्षक हे महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ करुन घ्या व आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करा, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोरोना महामारीमुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ या निधीतून 10 लक्ष रुपयाची आर्थिक मदत केली जात आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 1625 एवढी आहे. मृत्यूमुखी पडलेल्या जिल्ह्यातील 460 बालकांच्या आई किंवा वडील गेलेल्यांचा समावेश आहे. तर 15 बालकांचे आई आणि वडील दोघेही या महामारीत मृत्यूमुखी पडले आहे.  अशा मुलांची काळजी शासन घेत आहे. या मुलांना वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक छात्रवृत्ती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय आयुष्यमान भारत योजनेतून मुलांना 5 लक्ष रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचे हप्ते पीएम केअर फंडातून भरले जाणार आहे. याशिवाय सर्व शैक्षणिक सुविधा शासनामार्फत पुरविल्या जाणार आहे.

या योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 15 बालकांना 2 कोटी 25 लक्ष रुपयांचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये सात मुले तर आठ मुली आहेत. या योजनेव्दारे कोविडमुळे आपल्या आई-वडीलांना, कायदेशीर पालकांना, दत्तक आई-वडीलांना गमावले आहे, अशा मुलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

या योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पासबुक तसेच आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. आरोग्य विमा यांचा लाभ देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या नावे पोस्ट ऑफिसमध्ये 10 लक्ष रुपयांचे  मुदत ठेव जमा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वयाच्या 23 व्या वर्षी ही रक्कम मिळेल. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्नेहपत्रही यावेळी देण्यात आले. अशा बालकांना आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत 50 हजार रुपयांचे सानुग्रह निधी परस्पर त्यांच्या बँक खात्यात यापूर्वीच जमा करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनीही मनोगत व्यक्त केले.  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मंत्री, संसद सदस्य आणि आमदार यावेळी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते.

00000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती