आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयोगशील व्हा - कुलगुरू डॉ . दिलीप मालखेडे

 




आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयोगशील व्हा

- कुलगुरू डॉ . दिलीप मालखेडे

राज्यस्तरीय पाच दिवसीय चित्रमय प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

 

अमरावती , दि . ५ :  आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयोगशील व्हा . उद्योग व्यवसायात नवनवे प्रयोग करा. यातून तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतील व यातूनच तुम्हाला चाकोरीच्या बाहेर जाऊन रोजगाराची नवी संधी प्राप्त होईल, असा विश्वास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी यांनी आज येथे व्यक्त केला.

      माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाने राबविलेल्या विविध  विकासात्मक योजनांवर आधारित ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ राज्यस्तरीय चित्रमय प्रदर्शन शहरातील  संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहातील आर्ट गॅलरी येथे सुरु होते. आज या प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. मालखेडे बोलत होते .

 

कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, माहिती कार्यालयाचे उपसंचालक हर्षवर्धन पवार, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर, जिल्हा आरोग्य कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कमलाकर विसाळे, सहायक उद्योजकता व रोजगार अधिकारी प्रफुल्ल शेळके , नरेंद्र येते आदी यावेळी उपस्थित होते.

   विद्यार्थ्यांनी  चिकित्सक वृत्ती जागृत ठेवून संशोधनावर भर द्या, असे सांगून कुलगुरू डॉ. मालखेडे म्हणाले , तुम्ही निवडलेल्या क्षेत्रातील उपकरणे आणि अवजारांशी मैत्री करा. त्यात रममाण व्हा. तुम्ही निवडलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमामार्फत उद्योग  क्षेत्राकडे वळा. औद्योगिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ स्वयंरोजगार न मिळविता काळाची पावले ओळखून  लोकांच्या गरजा लक्षात घेवून नव -नवे उद्योग स्थापन करून इतरांसाठीही रोजगार निर्माण करावा. जास्तीत -जास्त कौशल्य संपादित करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थांना स्वावलंबी बनविण्यासाठी रोजगाराभिमुख व उपयुक्त प्रशिक्षण दिले जाते . या संस्थेमार्फत मिळालेल्या प्रशिक्षणामुळे तुम्ही स्वयंरोजगार निर्माण करू शकता.  व्यवसाय शिक्षणामध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्ही यामध्ये पदव्युत्तर शिक्षणही घेऊ शकता. यासाठी व्यावसायिक शिक्षण निवडण्याची खंत न बाळगता इतरांसाठीही रोजगार निर्माण करण्यासाठी प्रेरित व्हा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले .

            श्री . विसाळे यांनी रोजगाराच्या विविध संधीविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . ते म्हणाले , शासनाच्या विविध योजनांची माहिती तुम्ही खेड्यातील गरजू शेतकरी , बेरोजगार युवकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही माध्यम म्हणून काम करा व इतरांनाही शासकीय योजनांबद्दल माहिती द्या .

 

      श्री . शेळके म्हणाले की , कौशल्ययुक्त पिढी तयार करण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर आहे. आपला देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. यामुळे येथील कौशल्यपूर्ण युवकांना रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत . 'महास्वयंम ' ही जिल्हानिहाय नोकरीच्या संधी दर्शविणारी वेबसाईट आहे .कौशल्य विभागामार्फत वेगवेगळ्या उद्योगांसाठी अनुदानही मिळते . अशा योजनांची माहिती मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयांना भेटी द्या. प्रत्येक यंत्रणेकडे असलेल्या कामांची, योजनांची माहिती घ्या .नवीन संकल्पनेवर आधारित व्यवसाय सहजरित्या स्वयंरोजगार निर्माण करू शकतात.  आपली शक्तिस्थाने ओळखून आवडत्या क्षेत्राची निवड करण्याबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले .

श्री . साखरे यांनी यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण याविषयी उपस्थितांना माहिती दिली .लसीकरणाची मोहीम सर्वसामान्यांच्या आरोग्य रक्षणासाठी असून इतरांनाही लसीकरणासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .

 

 जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा लाडच्या नीलिमा गलफट ,भातकुलीच्या कीर्ती खरड , नांदगांव खंडेश्वरच्या रिना पेंढारकर ,दर्यापूरच्या प्रतिभा देशमुख , मुर्तिजापूरच्या दिपा देशमुख ,  अंजनगाव सुर्जीच्या सोनू खांडेकर या प्रशिक्षकांनी आपल्या प्रशिक्षणार्थीसह चित्रमय प्रदर्शनांना भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घेतली .

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक हर्षवर्धन पवार यांनी केले . सूत्रसंचालन माहिती सहायक पल्लवी धारव तर आभार प्रदर्शन माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी मानले .

 

चित्रमय प्रदर्शनाला आज विविध मान्यवरांच्या भेटी

 चित्रमय प्रदर्शनाच्या समारोपीय दिवशी आज विविध मान्यवरांनी भेटी दिल्यात. राज्य जलसंपदा राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक राहुल मोहोड ,ज्येष्ठ संपादक दिलीप एडतकर आदी मान्यवरांनी चित्रमय प्रदर्शनीचे पाहणी करून माहिती जाणून घेतली .

           **

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती