बुध्दपौर्णिमेला निसर्गप्रेमींनी घेतला अरण्याचा रोमांचकारी अनुभव

 

बुध्दपौर्णिमेला निसर्गप्रेमींनी घेतला अरण्याचा रोमांचकारी अनुभव

 

अमरावती, दि. 19 : मेळघाटच्या अरण्यात बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात मचाणावर बसून पाणवठ्यावर येणा-या वन्यप्राण्यांचे निरीक्षण व जंगलातला रात्रीचा रोमांचकारी अनुभव निसर्गप्रेमींनी घेतला.  

            पूर्वी प्राणीगणनेच्या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला. आता गणनेसाठी अधिक शास्त्रशुद्ध पद्धत अवलंबली जाते. तथापि, नागरिकांना अरण्यानुभव मिळण्याचे पूर्वीच्या उपक्रमाचे महत्व लक्षात घेऊन हा उपक्रम कायम ठेवण्यात आला व  ‘निसर्ग अनुभव’ या जनजागृती उपक्रमात रूपांतरित करण्यात आला आहे.

            मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे सिपना, अकोट, गुगामल, मेळघाट वन्यजीव, तसेच अकोला, पांढरकवडा आदी वन्यजीव विभागांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला.

कोविडकाळामुळे गत दोन वर्षे उपक्रम होऊ शकला नाही. आता निर्बंध दूर झाल्याने उपक्रमांत सहभागासाठी निसर्गप्रेमींमध्ये कमालीचा उत्सुकता व उत्साह होता. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, परभणी, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातील मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील निसर्गप्रेमीही उपक्रमात सहभागी होते.

चांदण्यात उजळून निघालेले अरण्य, रातकिड्यांचे आणि प्राण्यांचे निरनिराळे आवाज, हवेची झुळूक, पानांची सळसळ आणि पाणवठ्यावर येणारे विविध वन्यप्राणी यांचा अविस्मरणीय अनुभव निसर्गप्रेमींनी यावेळी घेतला. वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, उदमांजर असे अनेक वन्यजीव सहभागींना पाहता आले.

निसर्गप्रेमी, तसेच पर्यावरण व वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने मचाण आरक्षणाची संधी देण्यात आली. त्यात केवळ साडेसातशे रूपये आकारून जेवण, नाश्ता, पाण्याची कॅन, मचाणापर्यंत पोहोचविणे व आणण्यासाठी वाहन व्यवस्था पुरविण्यात आली. निसर्गप्रेमींसोबत मचाणावर एक वनकर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आला.

            मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सुमंत सोळंके, दिव्या भारती, विभागीय वनाधिकारी किरण जगताप, प्रभाकर निमजे, मनोजकुमार खैरनार यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. पर्यटन व्यवस्थापक स्वप्नील बांगडे, वन परिक्षेत्र अधिकारी योगेश तापस यांनी अथक परिश्रम घेतले.

00000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती