विकासाची प्रक्रिया अधिकाधिक सर्वसमावेशक व गतिमान - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

















महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण

विकासाची प्रक्रिया अधिकाधिक सर्वसमावेशक व गतिमान

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

            अमरावती, दि. 1 : कोरोनाकाळातही विविध क्षेत्रांतील सातत्यपूर्ण विकासामुळे महाराष्ट्र हे देशातील अव्वल राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी शासनाने अनेक योजना-उपक्रमांना गती देत व समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेत विकासाचा प्रवाह अधिकाधिक सर्वसमावेशक व गतिमान केला आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

            महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापनदिनोत्सवानिमित्त विभागीय क्रीडा संकुल येथे मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विभागीय आयुक्त पियुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आदी उपस्थित होते.

            पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी महाराष्ट्र दिनाच्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’ ही महाराष्ट्रभूमीचा गौरव करणारी कवी गोविंदाग्रज यांची कविता पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात उद्धृत केली.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाच्या साथीशी गेल्या अडीच वर्षापासून झुंजत असताना शासनाने विकासाचे चक्र थांबू दिले नाही. या काळात केलेल्या प्रभावी उपाययोजना, टप्प्याटप्याने हटवलेले निर्बंध आणि लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी यामुळे कोरोना साथीवर मात करण्यात आली व  राज्याच्या अर्थव्यवस्थेने उभारी घेतली. कोरोनाशी दोन हात करूनही देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही अधिक दराने राज्याच्या सकल उत्पन्नात होत असलेली वाढ ही अत्यंत आशादायी आहे.

            आर्थिक सर्वेक्षणानुसार, चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वाढीचा दर 8.9 टक्के राहण्याचा नमूद असताना महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा दर 12.1 टक्के राहील, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात  कृषी आणि संबंधित घटकांच्या वाढीबरोबरच उद्योग व सेवा क्षेत्राची वाढ गतीने होत आहे.

            त्या पुढे म्हणाल्या की, या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हाही अनेक क्षेत्रांत राज्यात अव्वल ठरला आहे. संसर्गजन्य साथीच्या निर्मूलनासाठी केवळ तात्कालिक नव्हे, तर कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने कामे होत आहेत. शहरी व ग्रामीण आरोग्य संस्थांचे, तसेच प्रयोगशाळांचे बळकटीकरण अशी अनेक कामे पूर्णत्वास जात आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरण 35 लाखांवर पोहोचले आहे.

            अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी नांदगावपेठ नजिक जागा निश्चित करण्यात आली असून, लवकरच उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. अमरावती-बेलोरा विमानतळासाठी 148 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाच्या कामाला गती मिळाली आहे.

            जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधव नैसर्गिक संकटात सापडला असताना प्रत्येक टप्प्यावर मदत योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. गत काळातील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या 1 लाख 99 हजार 869 शेतकऱ्यांना एकूण 139 कोटी 21 लाख 5 हजार 262 रूपयांची मदत करण्यात आली. ‘मनरेगा’मध्ये 2 हजार 128 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे व पुढील वर्षासाठी 6 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. विकेल ते पिकेल या संकल्पनेतून जिल्ह्यात शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात 295 विक्री केंद्रे सुरु केली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

            महिला व बालविकास विभागाने राष्ट्रीय पोषण महाअभियानातसंपूर्ण राज्यातून दुसरा क्रमांक मिळविला आहे.जिल्ह्यातील 59 स्मार्ट अंगणवाड्या आकारास येत असून, हा उपक्रम राज्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून त्यात विशेष ॲक्टिविटी रुम, तपासणी कक्ष, विशेष किचन आणि वेगळे स्वच्छतागृह असणार आहे. महिला व बालविकास भवनाचे काम प्रगतीपथावर आहे. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अमरावती पॅटर्न म्हणून राबविण्यात येणार आहे. माविम, उमेद उपक्रमांतून बचत गटांचे जाळे भक्कम करण्यात येत आहे. आदिवासी महिलांच्या उत्पादित वस्तूंना ‘मेळघाट हाट’ सारखे हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

            नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेत 3 हजारहून अधिक लाभार्थ्यांना 7 कोटी रुपयांहून अधिक अनुदानवाटप करण्यात आले. पोकरामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांचा अधिकाधिक शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, यासाठी अभियान हाती घेण्यात येत आहे.

            गुन्हे सिद्धतेत अमरावती शहर पोलीस आयुक्तालय राज्यात दुसरे ठरले आहे, असे सांगून त्यांनी पोलीस प्रशासनाच्या ‘रक्षादीप’, ऑनलाईन सायबर फसवणूक या विषयावर विशेष जनजागृती मोहिम, डायल 112 हेल्पलाईन आदी उपक्रमांचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

            अमरावती जिल्हा ‘मनरेगा’ कामांमध्ये गतवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर होता. यंदाही   ग्रामीण भागात नियोजनपूर्वक कामे राबविण्यात येत आहेत. त्यामुळे गावोगाव पायाभूत सुविधांच्या शेकडो कामांना चालना मिळाली. नांदगावपेठनजिक अतिरिक्त अमरावती एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यात आले असून, विविध सुविधांसाठी 42 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तिथे 14 मोठे टेक्सटाईल्स उद्योगांद्वारे1 हजार 875 कोटींची गुंतवणूक व सुमारे 5 हजार लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, शिक्षणमहर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा वारसा व विचार डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्यात विकासाची प्रक्रिया अधिकाधिक सर्वसमावेशक, लोकहितकारी व गतिमान करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

            अमरावती शहर पोलीस, जिल्हा ग्रामीण पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, महिला पोलीस पथक, गृहरक्षक दल यांनी पथसंचलन केले. अग्निशमन दल, दंगा नियंत्रण पथक, श्वान पथक, डायल 112 पथक, दामिनी पथक यांनीही पथसंचलनात सहभाग घेतला. या विविध दलांनी सादर केलेल्या सुंदर पथसंचलनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

00000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती