Monday, August 29, 2022

जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर




 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार

जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभाग घ्यावा

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 29 : राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

            राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 ऑगस्ट 2022 हा आहे.

            या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. या स्पर्धेचा तपशील व अर्जाचा नमुना maharashtra.gov.org या संकेतस्थळावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक 26 ऑगस्ट 2022 च्या शासन निर्णयात व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com याई मेल वर दिनांक 30 ऑगस्ट 2022 पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल,  उत्कृष्ट मंडळाच्या निवडीसाठी पर्यावरण पूरक मूर्ती, पर्यावरण पूरक देखावे, स्वातंत्र्याच्या चळवळीशी संबंधित देखावे, ध्वनी प्रदूषण विरहित वातावरण, मंडळाचे सामाजिक कार्य, मंडळांनी घेतलेल्या पारंपारिक क्रीडा स्पर्धा  पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, आयोजनातील शिस्त असे इत्यादी निकष ठेवण्यात आले आहेत

00000

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा -खासदार डॉ. अनिल बोंडे

 




मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा

-खासदार डॉ. अनिल बोंडे

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आढावा बैठक

अमरावती, दि.29 :  क्षयरोग तसेच इतर आजारांबाबत जनजागृतीसाठी मेळघाटात सर्वदुर शिबीरांचे आयोजन करावे. क्षयरोगाची तपासणी करतांना रुग्णांकडुन घेतलेले नमुने अचूकपणे तपासता यावे यासाठी आवश्यक यंत्रांची संख्या वाढवावी. खाजगी रुग्णालयांत क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची व त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करावे, अशा सुचना खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी केल्या.  

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा खासदार डॉ. बोंडे यांनी घेतला. बैठकिला माजी आमदार रमेश बुंदिले, माजी महापालिका सभापती तुषार भारतीय,  जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे,  डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, बालविकास प्रकल्प अधिकारी मंगल पांचाळ, निवेदिता दिघडे चौधरी आदी उपस्थित होते.

दर्यापूर, धारणी, अचलपूर, चिखलदरा, तिवसा, मोर्शी, वरुड व चुरणी या सर्व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात क्षयरोग रुग्णांची तपासणी व निदान करणारी यंत्रे चालू आहेत किंवा कसे याची माहिती तात्काळ सादर करावी. मेळघाटातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तात्काळ सादर करुन त्याबाबत पाठपुरावा करावा. जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे ग्रामीण रुग्णालये व आरोग्य केंद्रांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम प्राधान्याने करावे. अशा सुचना श्री. बोंडे यांनी यावेळी दिल्या.

मेळघाटात प्रामुख्याने बालके, महिला व सामांन्यांमध्ये आढळणाऱ्या सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी. या आजाराचे प्रमाण शोधून काढणे, चाचणी व उपचार करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. सिकलसेलचे निदान करणारी किट जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समिती किंवा आदीवासी उपयोजनेतुन निधी प्रस्तावित करण्याच्या सुचना डॉ. बोंडे यांनी दिल्या.

दृष्टीदोष असलेल्या बालकांना मोठ्या भिंगाचे चष्मे दिल्यास त्यांच्यात न्युनगंड निर्माण होऊ शकतो. त्यांच्यातील दृष्टीदोषावर आधुनिक शस्त्रक्रिया करता यावी याकरीता स्थानिक नेत्रतंज्ज्ञाचे सहकार्य घ्यावे. चिखलदरा, मेळघाट भागात सध्या त्वचेचे आजार उद्भवले असुन त्यावर उपचार होणे गरजेचे आहे असे सांगुन आशा सेविकांनी येणारे पंधरा दिवस मोहिम स्वरुपात राबवुन याबाबत सर्वेक्षण करावे, असे सांगितले.

महिला व बालविकास विभागाचा आढावा घेतांना श्री बोंडे म्हणाले, येणाऱ्या सप्टेंबरमध्ये जिल्हाभर पोषणमाह राबविण्याबाबत प्रभावी नियोजन करावे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात पोषण आहाराबाबत सर्व स्तरावर जनजागृती करण्‍याचे नियोजन करावे. सर्व विभागांनी  समाजमाध्यमांवरील आपली खाती अद्ययावत करावी. सर्वसामान्यांना माहिती मिळावी, त्यांच्यात आरोग्यविषयी जनजागृती व्हावी यासाठी या माध्यमांचा वापर करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेतांना ते म्हणाले, गावात वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात यावी. बचतगटांना मानधन तत्वावर ती स्वच्छतागृहे देखरेखीसाठी सोपविण्यात यावी. या स्वच्छता गृहाच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना श्री बोंडे यांनी केल्या.

00000

Thursday, August 25, 2022

धारणी उपजिल्हा रूग्णालयातील सिटी स्कॅन कक्षाचे काम लवकर पूर्ण करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर



 

धारणी उपजिल्हा रूग्णालयातील सिटी स्कॅन कक्षाचे काम लवकर पूर्ण करा

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

           

अमरावती, दि.25: धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी व सिटी स्कॅन कक्षाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिले.

 

            धारणी येथे नवसंजीवनी बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली, तसेच सुशीला नायर रुग्णालयालाही भेट दिली. प्रकल्प अधिकारी सावन कुमार, धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे, चिखलदऱ्याचे तहसीलदार मदन जाधव व दोन्ही तालुक्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

श्रीमती कौर म्हणाल्या की, मेळघाटातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करावी. उपजिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी व सिटी स्कॅन कक्षात आवश्यक यंत्रणा उपलब्ध करुन घेऊन काम लवकरात लवकर पुर्ण करावे. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज पुरवठा, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे आदी बाबींचा आढावा घेतला.

 

            त्यानंतर त्यांनी बिजूधावडी येथे भेट देऊन ई- पीक पाहणी प्रात्यक्षिकात सहभागी होऊन प्रत्येक बाबीची माहिती घेतली व अधिकारी-कर्मचारी, शेतकरी बांधव यांच्याशी संवाद साधला. या प्रक्रियेत कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई देणे यासाठी पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने ई-पीक पाहणी  उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

00000

क्रीडा संकुलात स्थानिक युवकांना सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण

 क्रीडा संकुलात स्थानिक युवकांना सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण

 

अमरावती, दि. 25: आगामी काळात होणारी सैन्य भरती लक्षात घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांचा समावेश व्हावा यासाठी तालुका क्रीडा संकुलांमध्ये विनामुल्य प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात येत आहेत. काही तालुक्यांमध्ये शिबीरांची सुरुवात झाली असून स्थानिक युवकांचा चांगला प्रतिसाद आहे.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यांत ही शिबीरे सुरु करण्याबाबत आखणी करण्यात आली आहे. तहसीलदारांकडून तालुक्यांतील माजी सैनिकांच्या सहकार्याने  तालुका क्रीडा संकुलांमध्ये काही तालुक्यांत शिबीरांना सुरुवात झाली. सैन्य भरतीत जिल्ह्याच्या टक्का वाढविण्यासाठी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

नागपूर येथे सप्टेंबर अखेरीस व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर सैन्य भरती होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर  चांदूर रेल्वे, वरुड, तिवसा, अंजनगाव सूर्जी आदी तालुक्यात शिबीरांना सुरूवात करण्यात येत आहे. चांदुर रेल्वे येथे शिबीरांला सुरूवात झाली असून 30 हून अधिक युवकांनी  प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे. शिबीरांमध्ये रनिंग, लांब उडी, पुलअप्स आदी शा‍रीरिक प्रशिक्षणाबरोबरच परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन विविध विषयांची तयारी करून घेण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिली.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या सोमवारी विविध कार्यक्रम

 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या सोमवारी विविध कार्यक्रम

अमरावती, दि.25: जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करून स्व. मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून  त्यांचा जन्मदिवस, 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त  विभागीय व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कार्यालय, अमरावती विभाग तसेच जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी, एकविध खेळाच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन ‘ ­­सर्व समावेशक आणि तंदुरूस्त समाजासाठी सक्षम’ म्हणून या संकल्पनेवर साजरा करण्यात येत आहे.

या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमाचे उद्घाटन अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथे दि.29 ऑगस्ट  रोजी सकाळी आठ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल. ऑनलाईन प्रश्न मंजुषेचे तसेच आशु तो डो आखाडाचे समन्वयक संघरक्षक बडगे, डिस्ट्रीक कराटे असोशिएशनच्या  संयोजक सोनल रंगारी प्रश्नमंजुषेसाठी  काम करणार आहेत. सर्व स्पर्धकांना  ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल.

हॉकी प्रदर्शनीय सामना, नेटबाल क्रीडा स्पर्धेचे समन्वयक  नितीन जाधव, मल्लंखाब प्रात्यक्षिकांचे समन्वयक नरेंद्र गाडे, कुडो क्रीडा स्पर्धेचे समन्वयक अस्लम शेख, बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेच्या समन्वयक धनश्री वावरे, बॅडमिंटनचे समन्वयक कृणाल फुलेकर, स्क्वॅश क्रीडा प्रकाराचे समन्वयक गणेश तांबे, बुध्दीबळाचे समन्वयक पवन डोडेजा, टेबल टेनिस स्पर्धेचे हमीद खान यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येत आहेत.

            राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. दिनेश म्हाला यांच्या मार्गदर्शनाखाली सायंन्स स्कोर मैदानात  फुटबॉल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा संकुल येथे धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा, अतुल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विजया कॉन्व्हेंटमध्ये तायंक्वांदो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येईल. या क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त झाल्याबाबत स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुल येथे वृक्षारोपण व परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात येईल.

वरील उपक्रमात भाग घेण्यासाठी इच्छुकांनी समन्वयकांशी संपर्क साधावा. तसेच क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, संस्था, मंडळे यांनी आपल्या स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करुन त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती वर्षा साळवी यांनी केले आहे.

000000

Wednesday, August 24, 2022

‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ उपक्रमासाठी 463 उमेदवारांच्या मुलाखती






 ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’

उपक्रमासाठी 463 उमेदवारांच्या मुलाखती


जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

अमरावती, दि. 24 : ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’  या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी मुलाखतीचा टप्पा व पालकांशी संवाद सत्र  जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत डॉ.  पंजाबराव देशमुख प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीत आज झाले. चाळणी परीक्षेत पात्र ठरलेल्या 463 उमेदवारांच्या जिल्हानिहाय मुलाखती घेण्यात आल्या.

योजनेसाठी एकूण 6 हजार 405 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यानंतर बीजगणित, इंग्रजी आदी विषयांची प्राथमिक चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या 463 उमेदवाराचे जिल्हानिहाय मुलाखती घेण्यात आल्या. सहायक आयुक्त कौशल्य विकास प्रफुल्ल शेळके, सहाय्यक प्राध्यापक  पंकज शिरभाते, कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार, नव गुरुकुल फाउंडेशन फॉर सोशल वेल्फेअरचे नितेश शर्मा हे उपस्थित होते.

‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’  हा अत्यंत उपयुक्त कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे. महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यातून निश्चितपणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी पालकांशीही संवाद साधला.

श्री. शेळके यांनी योजनेचे स्वरुप व वैशिष्ट्ये याबाबत माहिती उमेदवार व पालकांना प्रास्ताविकातून दिली. जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता योजना स्टँडअप इंडिया मार्जीन मनी योजनेत दहा लाभार्थी निवडणार

 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता योजना

स्टँडअप इंडिया मार्जीन मनी योजनेत दहा लाभार्थी निवडणार

 

       अमरावती, दि.24: केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता  ‘मार्जीन मनी’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी त्यात पाच व्यक्तींना लाभ मिळाला आहे.चालू वर्षात दहा प्रस्ताव मंजूरीचे उद्दिष्ट आहे.

नवउद्योजकांची मार्जीन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे उद्योजक लाभार्थ्यांना एकूण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्‌स्यातील जास्तीत जास्त 15 टक्के निधी शासनाकडून घेण्यात येतो. प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के निधी बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या कर्जाद्वारे उभा करावयाचा आहे. लाभार्थ्याला स्वहिस्‌स्यातील केवळ 10 टक्के निधी भरावयाचा आहे. उर्वरित 15 टक्के निधी ‘मार्जीन मनी’ म्हणून शासनाव्दारे उपलब्ध करून दिला जातो.

            सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या विकासात्मक योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

000000

चिखलदरा तालुक्यातील 15 गावांत नवीन रास्त भाव दुकाने संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिका-यांचे आवाहन

 चिखलदरा तालुक्यातील 15 गावांत नवीन रास्त भाव दुकाने

संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिका-यांचे आवाहन

 

अमरावती, दि. 24 : चिखलदरा तालुक्यातील 15 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानांसाठी इच्छूक संस्था व गटांनी 9 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी केले आहे.  

    

नवीन दुकानांची क्षेत्रे

 चिखलदरा तालुक्यातील टेटू, मेमना, लवादा, पांढराखडक, मोझरी, रामटेक, बागलिंगा, कुलंगणा बु., चौऱ्यामल, लाखेवाडा, भांडुम, सलिता, सुमिता, खुटिदा, कुही या 15 गावांतील रास्त भाव दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

निवडीचा प्राथम्यक्रम

नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना अर्ज करता येईल व याच प्राथम्यक्रमाने अर्जाचा विचार होईल. वैयक्तिक अर्जाचा विचार केला जाणार नाही.  

अर्जाची प्रक्रिया

इच्छूक संस्था, गटांना विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजता दरम्यान प्राप्त होऊन दाखल करता येतील. अर्जाची विक्री व स्वीकृत करण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट ते दि. 9 सप्टेंबर पर्यंत राहील. त्यानंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी कळवले आहे.

रास्त भाव दुकानाचा परवाना मंजूर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. समितीच्या निर्णयानुसार ग्रामीण क्षेत्रात स्वयंसहायता गटास परवाना देण्यापूर्वी प्रस्ताव महिला ग्रामसभेकडे पाठविला जाणार आहे व महिला ग्रामसभेच्या शिफारशीनंतर अंतिम निर्णय होईल. अर्जासोबत संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र, तीन वर्षांचे लेखे, हिशोब, कर्ज, परतफेड, बँकेची कागदपत्रे आदी सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

000

धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत

 


धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान

अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत

 

अमरावती, दि. 24 : धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना पायाभूत सुविधांसाठी २ लाख रूपये अनुदान दिले जाते. त्यासाठी संस्थांनी अर्ज करण्यासाठी मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. अधिकाधिक संस्थांनी या यांजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

                धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी, अनुदानित व विना अनुदानित किंवा कायम विना अनुदानित, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी २ लाख रूपये अनुदान दिले जाते.  मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख, पारशी व ज्यू आदी अल्पसंख्याक समाजाचे किमान ७० टक्के विद्यार्थी शाळेत शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगांच्या शाळांमध्ये किमान ५० टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. इच्छूक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनातील नियोजन शाखेत 31 ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

खालील सुविधांसाठी मिळते अनुदान

 

शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे, अद्ययावत करणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनाची साधने, एलसीडी प्रोजेक्टर, सॉफ्टवेअर आदी, इंग्रजी लँग्वेज लॅब, शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे, प्रयोगशाळा उभारणे व अद्ययावत करणे, प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे, दुरूस्ती, झेरॉक्स मशिन, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आदींसाठी अनुदान मिळते. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने डीआयईएस कोड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी इन्स्टिट्यूट कोड, तसेच अपंग शाळांनी लायसन्स नंबर देणे आवश्यक आहे. शासन निर्णय व अर्जाचा नमुना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुदतीनंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाही, असे कळविण्यात आले आहे.

 

00000

Tuesday, August 23, 2022

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

 




जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

अमरावती, दि.23: जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेला गुन्हा आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.

जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अजाअजप्रका  कायद्यातंर्गत जुलै महिन्यात झालेल्या गुन्ह्यासंबंधात आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जुलै महिन्यात शहरी विभागात एकूण 6 तर ग्रामीण भागात एकूण 8 अशा एकूण 14 गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पोलीस  तपासावर असलेले गुन्हे, हायकोर्ट  स्थगिती गुन्हे, अपिल प्रलंबित गुन्हे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित गुन्हे याबाबत आढावा घेण्यात आला. अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणात निधी प्राप्त होताच, तात्काळ अर्थसहाय वाटप करण्यासाठी निर्देश देण्यात आले. बैठकीमध्ये समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार,  पोलिस निरीक्षक अर्जून ठोसरे, उप पोलिस अधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे, ॲङ अनुप्रिती ढवळे, शासकीय अभियोक्ता राजेंद्र महल्ले, अशासकीय सदस्य दिलीप काळबांडे, समाज कल्याण निरीक्षक, एस.आर.कोंडे आदी उपस्थित होते.

0000

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी

बँक खाते आधारकार्डशी संलग्न करा

-      जिल्हाधिकारी पवनीत कौर

            अमरावती, दि.23: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतंर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना ई- केवासी व एनपीसीएल सिडेड बँक खात्यासोबत आधारकार्ड संलग्न करण्यासाठी आता दि.31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅंक खात्यासोबत आधारकार्ड संलग्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर  यांनी केले आहे.

            पी.एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई- केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ज्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी व एनपीसीएल सिडेड बँक खाते सोबत आधार संलग्न केले नाही, त्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नसल्याबाबत कळविण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांची बँक खाते आधारकार्डशी संलग्न झाल्यानंतर एप्रिल 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा करणार येणार असल्याचे शासनाने सूचित केले आहे. तसेच पीएम किसान पोर्टलवर खाते दुरूस्तीची सुविधा बंद करण्यात आली आहे.

            पी. एम. किसान योजनेंतंर्गत जिल्ह्यातील ई-केवायसी व एनपीसीएल सिडेड बँक खात्यासोबत आधार संलग्न करण्यासाठी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या तालुका, गावनिहाय याद्या amravati.gov.in  संकेतस्थळावर (सूचना-घोषणा) प्रसिध्द करण्यात येत आहे.

या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीतील ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी व एनपीसीएल सिडेड बँक खात्यासोबत आधार संलग्न केले नसेल, त्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्यासाठी सी. एस. सी. केंद्राशी संपर्क साधून किंवा pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नर -ईकेवायसी न्यू हा पर्याय निवडावा. तसेच एनपीसीएल सिडेड बँक खात्यासोबत आधार संलग्न करण्यासाठी बँक खाते असलेल्या संबंधित बँकेशी संपर्क साधून दि. 31 ऑगस्ट 2022 अखेर पर्यंत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.

00000

Monday, August 22, 2022

पीक विमा कंपनीकडुन तालुका समन्वयक नियुक्त

 


पीक विमा कंपनीकडुन तालुका समन्वयक नियुक्त

 

अमरावती दि.22 (विमाका) : जिल्ह्यात सन 2022-23 करिता पीक विम्यासाठी भारतीय कृषि इन्शुरंस कंपनीची निवड झालेली आहे. शेतकरी बांधवांना संपर्क साधण्यासाठी तालुका समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.

 नितीन मधूकर सावळे यांची जिल्हा समन्ययक पदी नियुक्ती झाली असुन त्यांचे कार्यालय काँग्रेस नगर रस्त्यावरील राणा कॉम्प्लेक्स मध्ये आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9403265135 हा आहे.

तालुका कार्यालये व संपर्क क्रमांक

अचलपूर येथील कार्यालय नगर परिषद मार्केट, सेट्रल बॅक ऑफ इडिया च्या मागे, आठवडीबाजार परतवाडा, ता. अचलपूर येथे असुन तालुका समन्वयक मनीष ज्ञानेश्वर मोरे  (मो. क्र. 7709171603) हे आहेत.

अंजनगांव सुर्जी येथील कार्यालय श्रीराम संकुल मार्केट, अकोट जुना बस स्टॅड अंजनगाव सुर्जी ता. अजनंगाव सुर्जी  येथे असुन तालुका समन्वयक संकेत ज्ञानेश्वरराव वाडाल,(मो. नं.7020945972) हे आहेत.

भातकुलीचे कार्यालय बुध्द कॉम्पलेक्स, दर्यापूर रोड ता. भातकुली, येथे असुन तालुका समन्वयक, नितेश मनोहराव तायडे (मो. नं.9075460919) हे आहेत.

चांदूर रेल्वेचे कार्यालय संताबाई यादव रोड नवीन अमरावती बायपास रोड तहसील चांदूर रेल्वे येथे असुन तालुका समन्वयक, मा. जुनेद अब्दुल मजीद (मो. क्र.9172853317) हे आहेत.

चांदूर बाजार येथील कार्यालय नानग्रीया नगर चांदूर बाजार ता. चांदूर बाजार येथे असुन तालुका समन्वयक, शुभम अशोकराव राऊत (मो. नं. 8390374563)हे आहेत.

 चिखलदरा येथील कार्यालय नगर परिषद मार्केट चिखलदरा ता. चिखलदरा येथे असुन तालुका समन्वयक,शुभम अशोकराव सराफ (मो. क्र.7020243012) हे आहेत.

दर्यापूर येथील कार्यालय सहजिवन कॉलनी आर्शिवाद हॉस्पीटलच्या जवळ, साई नगर दर्यापूर ता. दर्यापूर येथे असुन तालुका समन्वयक, शंशाक अशोकराव उमक (मो. क्र.9604833416)हे आहेत.

धामणगाव रेल्वे येथील कार्यालय बालाजी टायर ॲड ऑटोमोबाइल, अंजनसिंगी रोड, धामणगाव रेल्वे तालुका धामणगाव रेल्वे येथे असुन तालुका समन्वयक वैभव सुभाष महल्ले (मो.क्र.8788854572 )हे आहेत.

धारणी येथील कार्यालय वार्ड नं. 7 पोस्ट ऑफीस रोड धारणी, रवी पटेल क्लिनीक तालुका धारणी येथे असुन तालुका समन्वयक दिनेश रामकृष्ण सोनोने, (मो. क्र. 8805959218 ) हे आहेत.

मोर्शी येथील कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती रोड, मोर्शी येथे असुन तालुका समन्वयक रामेश्वर डोंगरदिवे (मो.क्र.8600296073) हे आहेत.

नांदगाव खंडेश्वर येथील कार्यालय  बुधवारा चौक, जुना आठवडी बाजार, अमरावती रोड येथे असुन  तालुका समन्वयक खुशाल पांडे (मो क्र 8698244145) हे आहेत.

तिवसा येथील कार्यालय वार्ड नं. 6 एसबीआय बॅक जवळ असुन तालुका समन्वयक पवन कदम (मो क्र 9325408685) हे आहेत.

वरुड येथील कार्यालय बस स्टॅड जवळ डिटीडिसी करीया सर्विस, जिजाऊ नगर, वार्ड नं. 6 येथे असुन तालुका समन्वयक राजेश कळमकर( मो क्र.9309506399) हे आहेत.

000000


DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...