आमझरी हे ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित होणार स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल - खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सीईओ अंशु सिन्हा

 



आमझरी हे मधाचे गाव’ म्हणून विकसित होणार

स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल

-         खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सीईओ अंशु सिन्हा

 

अमरावती, दि. 3 : चिखलदरा तालुक्यातील आमझरी हे मधाचे गाव म्हणून विकसित होण्यासाठी या योजनेची सर्व विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल, असा विश्वास राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंशु सिन्हा यांनी आज व्यक्त केला.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत आमझरी येथे मधाचे गाव संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने श्रीमती सिन्हा यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली, तसेच विविध विभागाच्या अधिका-यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावन कुमार, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपीन जगताप ,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. प्रदीप चेचरे यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, सिपना महाविद्यालयातील मधुमक्षिका पालन विभागप्रमुख आदी अनेकजण उपस्थित होते.

श्रीमती सिन्हा म्हणाल्या की,  नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, ग्रामीण भागातील युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मधाचे योग्य व शास्त्रीय पद्धतीने संकलन व त्यानुषंगाने उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. मधाचे गाव म्हणून विकसित होण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.

मधमाश्यांचे पर्यावरणातील महत्व मोठे आहे. त्याचा पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठीही लाभ होतो. हे लक्षात घेता मधमाश्यांच्या संवर्धनाबाबत उपक्रम आखण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल व मधुपर्यटनाच्या माध्यमातून गावाचा विकास होईल. मध केंद्र योजनेत मधमाशीपालनासाठी प्रशिक्षण, साहित्यवाटप, अनुदान आदी सुविधा मिळतात. त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांना करून द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

श्रीमती सिन्हा यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना उपक्रमाची माहिती दिली. यावेळी स्थानिकांना आग्या मधमाश्यांचे कीटवाटप करण्यात आले. खादी व ग्रामोद्योग आयोग व वन विभागामार्फत आमझरी येथील महिलांना नुकतेच अगरबत्ती मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांना यावेळी प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

000 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती