महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असावे - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे



















महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव

प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असावे

-  विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

अमरावती, दि. 1 : महसुली कामांबरोबरच इतर सर्व कामे पूर्ण होण्यासाठी महसूल विभागाला जबाबदारी पार पाडावी लागते. शासनाची प्रतिमा आपल्या कामांवर निर्भर असते. महसूल सेवेच्या माध्यमातून लोकसेवेची संधी आपल्याला मिळते. त्यामुळे ‘हे काम माझे नाही अशी भावना न बाळगता सर्व विभागांशी समन्वय ठेवून नागरिकांचे प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

महसूल दिनानिमित्त बचतभवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, रणजीत भोसले, विवेक घोडके, मनीष गायकवाड, तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी, प्रज्ञा महांडुळे, अधिक्षक उमेश खोडके यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

महसूल विभागातील उत्कृष्ट कार्याबद्दल यावेळी उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी, नायब तहसीलदार अक्षय मंडवे, अव्वल कारकून विजय भगत, मंडळ अधिकारी प्रकाश बमनोटे, महसूल सहायक पंकज खानझोडे,  तलाठी भूषण बोरोडे, वाहनचालक राजेश भांडे, शिपाई विजय ढोके, कोतवाल मनोहर नागपुरे, पोलीस पाटील सुधीर जामुनकर यांना यावेळी गौरविण्यात आले.  

 

विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. नागरिकांच्या हितासाठी शासनाचे काम पार पाडण्याची जबाबदारी मुख्यत्वे महसूल प्रशासनाला पार पाडावी लागते. कुठलीही नवीन योजना तयार होताना महसूल विभागाला गृहित धरून कार्यवाही होते. हा विश्वास कायम ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.

कार्यालयीन जबाबदारी समर्थपणे पूर्ण करतानाच आपल्यातील कलागुण व छंदही जोपासले पाहिजेत. विविध उपक्रमांत सहभाग घेतला पाहिजे. कार्यालयीन कामाचीही गुणवत्ता व गती वाढण्यास त्याचा निश्चित फायदा होता, असेही डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी   श्रीमती कौर म्हणाल्या की, जिल्ह्यात आज महसूलदिनी ‘स्वर्णजयंती महाराजस्व अभियान व ‘ई पीक पाहणीची सुरुवात होत आहे. अचलपूर तालुक्यात ई पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यात उत्कृष्ट काम झाले. जिल्ह्यात ॲपद्वारे अद्याप 75 टक्के काम झाले. ते पूर्णत्वास न्यावे. मतदार नोंदणीला आधार कार्ड लिंक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.  स्वर्णजयंती महाराजस्व अभियानात मंडळ स्तरावर नियमितपणे शिबिरे घेऊन नागरिकांची कामे पूर्ण करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले. अपर जिल्हाधिकारी श्री. सिद्धभट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. भोसले यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती महांडुळे यांनी आभार मानले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

00000

 

  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती