अमरावतीत स्टार्टअप व नाविन्यता यात्रेला सुरुवात तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना मिळेल -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे





अमरावतीत स्टार्टअप व नाविन्यता यात्रेला सुरुवात

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना मिळेल

-विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

 कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा उपक्रम

          अमरावती, दि. 15 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ्‍ विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आला. तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी व्यक्त केला. 

राज्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा सुरु करण्यात आली आहे. अमरावतीत त्याचा शुभारंभ मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात झाला. विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी यात्रा रथाला हिरवी झेंडी दाखविली. खासदार अनिल बोंडे, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, पोलीस आयुक्त आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, सहायक रोजगार व कौशल्य विकास आयुक्त प्रफुल शेळके, नरेंद्र येते आदी अधिकारी उपस्थित होते. 

तळागाळातील व ग्रामीण दुर्गम भागातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे तसेच राज्याची उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा या स्टार्टअप यात्रेचा उद्देश आहे.

स्टार्टअप, उद्योजकता, नाविन्यता, युनिकॉर्न याविषयक मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी व जनजागृती केली जाणार असून नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या 134 युवकांना 10 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

या यात्रेतील मोबाईल व्हॅन ही प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय, लोकसमुह एकत्रित होणाऱ्या जागा या ठिकाणी जाऊन उद्योजकता आणि स्टार्टअपविषयी जनजागृती करेल. नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करुन त्यांना माहिती देण्यात येईल. यात्रेमध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्रांचेही (Bootcamp) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक उद्योजकांची व्याख्याने होतील. नवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या नागरीकांना त्यांच्या संकल्पनांचे शासकीय अधिकारी, उद्योजक यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

१० हजारापासून १ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके

          कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना पारितोषिके दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील उत्तम 10 कल्पनांचे राज्यस्तरीय तज्ञ समितीसमोर अंतिम सादरीकरण होईल. जिल्ह्यांमध्ये उत्तम 3 विजेत्यांची निवड केली जाईल. 25 हजार, 15 हजार व 10 हजार अशी पारितोषिके देण्यात येतील. विभागस्तरावर 6 सर्वोत्कृष्ट नवउद्योजक व 6 सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. विजेत्या संकल्पनांना प्री-इन्क्युबेशन तसेच इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल, निधी सहाय्य, स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ञ व संस्थांद्वारे मार्गदर्शन, सॉफ्टवेअर, क्लाऊड क्रेडीट्स यांसह इतर आवश्यक पाठबळ देण्यात येणार आहे.

ग्रामीण तसेच निमशहरी भागामध्ये खूप कल्पक युवावर्ग आहे. त्यांना कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पनांचा समावेश यात करता येणार आहे.

स्टार्टअप रँकींगमध्ये महाराष्ट्र टॉप परफॉर्मर

          स्टार्टअप रँकींग 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर श्रेणीमध्ये आले आहे. देशातील एकूण 2 लाख 13 हजार स्टार्टअप्सपैकी 36 हजार 800 म्हणजे 18 टक्के स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान 25 ते 30 स्टार्टअप्स आहेत.

 

00000 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती