मागासवर्गीय व्यक्तींसाठी असलेल्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन

 

मागासवर्गीय व्यक्तींसाठी असलेल्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन

अमरावती, दि.2: मागासवर्गीय व्यक्तींसाठी सुरु केलेली 20 टक्के बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

वैयक्तिक  व्याज परतावा योजना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या ‘वैयक्तिक  व्याज परतावा योजनें’तर्गत जास्तीत जास्त 10 लक्ष रुपयांपर्यंत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होऊ शकेल तसेच या कर्जाची नियमित कर्जफेड केल्यास व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या खात्यात दरमहा जमा करण्यात येईल. या योजनेच्या परतफेडीचा कालावधी बँकेच्या नियमावलीनुसार राहील. महामंडळाच्या संगणक प्रणाली www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना) यावर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

थेट कर्ज योजना

थेट कर्ज योजनेची मर्यादा 1 लक्ष रुपये असून व्याज दर द.सा.द.शे 4 टक्के आहे. तसेच कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्षांचा आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. ज्यांचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 अंक आहे, अशांना या कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.

20 टक्के बीज भांडवल योजना

20 टक्के बीज भांडवल योजनेंतर्गत 5 लक्ष रुपये मंजूर असून या रकमेपैकी 20 टक्के रक्कम महामंडळ, 75 टक्के बँक तसेच लाभार्थींचा सहभाग 5 टक्के राहील. महामंडळाचा व्याज दर द.सा.द.शे. 6 टक्के असून बँकेचा व्याज दर बँकेच्या प्रचलित दरानुसार राहील. परतफेडीचा कालावधी 5 वर्षांचा आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाईल. त्या कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून केला जाईल. महामंडळाच्या संगणक प्रणाली www.msobcfdc.org               (गट कर्ज व्याज परतावा योजना) यावर नाव नोंदणी अनिवार्य आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत उच्च शिक्षणासाठी राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम प्रवेशासाठी बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी 10 लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये एवढे कर्ज देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्याचे वय 17 ते 30 वर्षे दरम्यानचे असावे. तसेच तो इ.मा.व. प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागासाठी 8 लक्ष रुपयांपर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत असावी.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे अथवा दुरध्वनी क्रमांक 0721-2550339 वर संपर्क साधाण्याचे आवाहन  जिल्हा व्यवस्थापक  एस. एस. तारे यांनी केले आहे.

 0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती