Thursday, August 4, 2022

‘सुपर स्पेशालिटी’त शस्त्रक्रिया यशस्वी आईने किडनी देऊन मुलाचा जीव वाचवला; दोघेही सुखरूप

 







‘सुपर स्पेशालिटी’त शस्त्रक्रिया यशस्वी

आईने किडनी देऊन मुलाचा जीव वाचवला; दोघेही सुखरूप

 

अमरावती, दि. 4 : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या युवकावर विभागीय संदर्भ रूग्णालयाच्या चमूने किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. या युवकाला त्याच्या आईने किडनी दिली असून, शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यानंतर युवकास आज घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी याप्रसंगी उपस्थित राहून युवकाशी संवाद साधून त्याला शुभेच्छा दिल्या. डॉ. श्रीकांत महल्ले, डॉ. मंगेश मेंढे आदी उपस्थित होते. अमर  खराटे हा युवक बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवाशी असून, त्याचे वय 36 वर्ष आहे. त्याच्या आई रत्नमाला खराटे या 58 वर्षांच्या आहेत. श्री. खराटे यांना गत अडीच वर्षांपासून किडनीचा विकार होता. त्यांना शस्त्रक्रियेबाबत सल्ला डॉक्टरांनी दिला होता. अमरच्या आई रत्नमाला खराटे यांनी आपल्या मुलाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विभागीय संदर्भ रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. निखील बडनेरकर यांनी याबाबत मार्गदर्शन केले. 

आवश्यक त्या सर्व तपासण्या होऊन दि. 21  जुलैला अमर यांना विभागीय संदर्भ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर 22 जुलैला यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यामुळे त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. शल्यविशारद डॉ. संजय कोलते, डॉ. राहूल पडोळे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहूल धुळे, तसेच बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. प्रणित घोडमारे, डॉ. पौर्णिमा वानखडे, डॉ. बाळकृष्ण बागवाले यांच्या चमूने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. श्रीकांत महल्ले आदींनी  मार्गदर्शन व सहकार्य केले.

 

कोविडकाळानंतर विभागीय संदर्भ रूग्णालयात यशस्वीपणे पूर्ण झालेली ही 14 वी शस्त्रक्रिया आहे. रुग्णालयात तज्ज्ञांची चमू, विशेषोपचार उपलब्ध आहेत. गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी यावेळी केले. 

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...