शासनाच्या योजनांबाबत मेळाव्यात माजी सैनिक व कुटुंबियांना मार्गदर्शन

 







शासनाच्या योजनांबाबत मेळाव्यात माजी सैनिक व कुटुंबियांना मार्गदर्शन

 

अमरावती दि.09 (विमाका) : देशाचे रक्षण करणारे सैनिक तसेच माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांनी प्रशासनाकडून आयोजित होणाऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून या योजनांची माहिती व लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशिष  बिजवल यांनी आज येथे केले.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील बचतभवनात माजी सैनिकांचा मेळावा आयोजित  करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा सैनिक अधिकारी मनीष गायकवाड, सहायक  जिल्हा सैनिक  कल्याण अधिकारी ठकसेन पाठारे, बहादूर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बी एस राय, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी यावेळी उपस्थित होते. श्री बिजवल म्हणाले, अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आपल्या देशाच्या सीमेवर सैनिक तैनात आहेत. आपण त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे.

 

जिल्ह्यात 5 हजार 421 माजी सैनिक, त्यांच्या विधवा व त्यांचे अवलंबित असे एकूण 22 हजार लाभार्थी आहेत. माजी सैनिक, सैनिकांच्या वीरपत्नी, विरमाता, सैनिकांच्या अवलंबितांचे कौटुंबिक, शेती व नोकरीविषयक, पोलीस विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे आदी सोडविण्याबाबत तसेच माजी सैनिकांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय योजनांची माहिती, त्यांचा  लाभ  घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आदी माहिती श्री पाठारे यांनी  दिली. मेळाव्यात योजनांची माहिती  देणारे स्टॉल  लावण्यात आले होते.

नायब  तहसीलदार प्रवीण देशमुख, संध्या ठाकरे, टीना चव्हाण, तहसील कार्यालयाचे  अधिकारी, कर्मचारी, मंडळ  अधिकारी, तलाठी  उपस्थित होते. सूत्रसंचालन निवासी नायब तहसीलदार सुनील रासेकर यांनी केले. या कार्यक्रमात विरपत्नी इंदुमती दंदी यांना श्री बिजवल  यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती