अपंग व्यक्ती व महिला बचत गटांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’जिल्ह्यात 240 केंद्रांचे होणार वितरण - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


अपंग व्यक्ती व महिला बचत गटांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’
जिल्ह्यात 240 केंद्रांचे होणार वितरण
      -  जिल्हाधिकारी शैलेश नवाल

       जिल्ह्यात 240 गावांत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असून, ही केंद्रे प्राधान्याने अपंग व्यक्ती व शासनमान्य महिला बचत गटांना देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.

        याबाबतचे अर्ज, सूचना, आदी माहिती www.amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूकांनी आपले अर्ज सेतू समिती (सेतू कक्ष), जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अमरावती येथे स्वत: उपस्थित राहून पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचपूर्वी सादर करण्याचे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.

      एका गावासाठी अपंग व्यक्ती किंवा महिला बचत गट यापैकी कोणाचाही अर्ज प्राप्त न झाल्यास सर्वसाधारण उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल आणि त्यात सीएससी सेंटर कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

       अपंग व्यक्ती किंवा बचत गटाचे सदस्य हे त्या गावातील, प्रभागातील रहिवासी असावे. सर्वसाधारण अर्जदार सीएससी केंद्र संचालक असल्यास त्यांना प्राधान्य मिळेल, पण त्यांनी मागील तीन महिन्यांचे सीएससी स्टेटमेंट जोडणे आवश्यक आहे. सेवा केंद्रे प्रदान करण्याचे अधिकार जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष जिल्हाधिका-यांचे आहेत. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही अशासकीय व्यक्ती किंवा संस्थांना केंद्र प्रदान करण्याचे अधिकार नाहीत. अशा व्यक्ती किंवा संस्थांवर विश्वास ठेवू नये. केंद्र मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा संघटनेचा दबाव आणल्यास संबंधित उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येईल व दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

          एका प्रभाग, ग्रामपंचायत, गावांमध्ये रिक्त संख्येच्या तुलनेत अधिक अर्ज प्राप्त झाल्यास गुणांकन पद्धती, शैक्षणिक पात्रता व इतर बाबी तपासून निवड केली जाणार आहे.

          अपंग व्यक्ती, महिला बचत गट आदींनी यासाठी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती