जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरणगरीब व गरजू बांधवांना लाभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरण
गरीब व गरजू बांधवांना लाभ -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

        कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जारी लॉकडाऊन, संचारबंदीच्या काळात गरजू बांधवांसाठी  शिवभोजन थाळीचे दर पाच रूपये करण्यात आले. त्याचप्रमाणे, या काळात योजनेंतर्गत जिल्ह्यात थाळ्यांची संख्या अडीच हजार प्रतिदिन एवढी वाढविण्यात आली. त्यानुसार साडेतीन लाखांहून अधिक थाळ्यांचे वितरण आतापर्यंत झाले. गरीब, वंचित व गरजू बांधवांना या योजनेचा लाभ मिळत असून, ही योजना आधार ठरली आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

           कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर राज्यात काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला. लॉकडाऊन काळात गरजू बांधवांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून योजनेतील थाळीची किंमत  प्रति थाळी 5 रुपये इतकी करण्यात आली. बाजार समिती, रूग्णालये व इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उपाहारगृहांतून ही थाळी उपलब्ध करून देण्यात आली. चिखलदरा तालुक्यातील चुरणीसारख्या ठिकाणाचाही आवश्यकता लक्षात घेऊन समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील गरजू नागरिकांना यामुळे  मदत झाली, अशी माहिती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

         गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताक दिनी शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ झाला. सुरुवातीला जिल्हा मुख्यालयी सुरु झालेली ही योजना विस्तार करून तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे. त्यामुळे  ठिकठिकाणी ही थाळी उपलब्ध होऊन गरजूंना त्याचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात शिवभोजन योजनेंतर्गत 22 केंद्रे कार्यरत आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी सांगितले.

        परतवाडा येथे अनिल उपाहारगृह व कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्ञानेश्वरी उपाहारगृह, धामणगाव रेल्वे येथे भगतसिंह चौकातील गणेश भोजनालय, तसेच अंबिका भोजनालय, तिवसा तालुक्यात तळेगाव ठाकूर गोदावरी महिला बचत गट, दर्यापूरला बसस्थानकानजिक गोपाळ हॉटेल व कृषी उत्पन्न बाजार समितीनजिक प्रसाद उपाहारगृह, धारणीला बसस्थानकानजिक गुरूकृपा भोजनालय, नांदगाव खंडेश्वर येथे चव्हाळे शाही भोजनालय व बसस्थानकानजिक राणा उपाहारगृह, चांदूर बाजार येथे बसस्थानकानजिक राहूल बहुउद्देशीय शिक्षण संस्था, चांदूर रेल्वे येथे राजश्री फॅमिली गार्डन येथे शिवभोजन थाळी उपलब्ध आहे.

       अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरात महालक्ष्मी उपाहारगृह, जिल्हा रुग्णालयात आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ उपक्रम, कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी भोजनालय, एसटी उपाहारगृह, सरोज चौकात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह  कन्झुमर्स फेडरेशन उपक्रम, भातकुली बसस्थानकानजिक साई योगी फॅमिला गार्डन उपाहारगृह, अंजनगाव सुर्जी येथे समता भोजनालय, वरूड येथे बसस्थानकामागे यशवंत महिला केटरर्स, मोर्शी येथे बसस्थानकासमोर यशवंत महिला केटरर्स आदिवासी बचत गट येथे शिवभोजन थाळी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथे_ स्व. हरिराम बाबुलाल बहुउद्देशीय शिक्षण संस्था येथेही थाळी उपलब्ध असून, स्थानिक बांधव त्याचा लाभ घेत आहेत, अशी माहितीही श्री. टाकसाळे यांनी दिली.

        शिवभोजन थाळीसाठी शासनाने निश्चित केलेली किंमत शहरी भागात 50 रुपये प्रति थाळी असून ग्रामीण भागात 35 रुपये इतकी आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक ग्राहकाकडून थाळीपोटी केवळ 5 रुपये आकारले जातात. त्याव्यतिरिक्त  उर्वरित रक्कम अनुदान म्हणून केंद्रचालकाला देण्यात येते. शहरी भागात अनुदानाची ही रक्कम 45 तर ग्रामीण भागात 30 रुपये इतकी आहे.  
                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती