नेत्रदान, अवयवदान उपक्रमासाठी महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य करू - महापौर चेतन गावंडे


      




 हरिना नेत्रदान समितीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम    

नेत्रदान, अवयवदान उपक्रमासाठी महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य करू

-          महापौर चेतन गावंडे

अमरावती, दि. 28 :  नेत्रदान, अवयवदान व देहदानाबाबत जागृती व प्रोत्साहनासाठी अमरावती महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे शहराचे महापौर चेतन गावंडे यांनी आज येथे सांगितले.

समाधाननगरातील हरीना नेत्रदान समितीच्या स्व. मंगलजीभाई पोपट नेत्रालयातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम महापौर श्री. गावंडे यांच्या हस्ते झाला, त्यानिमित्त संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, समितीचे अध्यक्ष मनोज राठी, उपाध्यक्ष चंद्रकांतभाई पोपट, सचिव अमित चांडक, सुरेंद्र पोफळी, शरद कासट, सुरेश जैन, शरणपालसिंग अरोरा, मनीष सावला, अशोक राठी, नरेश सोनी, मोनिका उमक, पप्पू गगलानी, धीरज गांधी, राजेंद्र वर्मा, सीमेश श्रॉफ, घनश्याम वर्मा, दिनेश वर्नदाणी, डॉ. विधळे, अविनाश राजगुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महापौर श्री. गावंडे म्हणाले की, नेत्रदान, अवयवदान व देहदानाबाबत सर्वदूर जागृती आवश्यक आहे. हरीना फाऊंडेशनअंतर्गत हरीना नेत्रदान समिती, स्व. मंगलजीभाई पोपट नेत्रालय, स्व. मधुसूदनजी जाजोदिया नेत्र प्रत्यारोपण केंद्र व स्व. चुन्नीलालजी मंत्री अवयवदान समिती या संस्था अत्यंत हिरीरीने काम करत आहेत. जोपर्यंत शेवटच्या माणसाचा विकास होत नाही, तोपर्यंत संपूर्ण समाजाचा विकास होत नाही, हे लक्षात घेऊन तळागाळातील नागरिकांसाठी, अंत्योदयासाठी या संस्था काम करत आहेत. त्यांच्या कार्याला महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. गावंडे यांनी सांगितले.

दिवंगत डॉ. एव्हीएम मदनगोपाल यांनी स्थापलेल्या संस्थेचे गरीब व गरजूंना नेत्रोपचार, नेत्रदान, अवयवदान व देहदानाचे कार्य हरीना समिती पुढे नेत आहे. अशा लोकहितैषी संस्था शहराची, समाजाची संस्कृती उन्नत करत असतात. अवयवदान, देहदानासाठी संस्थेकडून होणारी जागृती व कार्य भविष्यातील पिढ्यांसाठीही महत्वाचे ठरणार आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले.

हरीना नेत्रदान समितीतर्फे नेत्रालयात अत्यंत कमी दरात नेत्रोपचार उपलब्ध करून दिले जातात. गोरगरीब व गरजू व्यक्तींना त्याचा लाभ होतो. नेत्रालयाचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी सर्वदूर माहिती पोहोचणे व  आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. पोपट यांनी केले. संस्थेतर्फे नेत्रदान, अवयवदानाबरोबरच गरजूंना इतर बाबतींत वेळोवेळी मदत केली जाते. कोविड संकटकाळात संस्थेतर्फे भोजनदानाचा उपक्रमही चालविण्यात आला, असे श्री. पोफळी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

                                    000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती