कोरोना उपचार व यंत्रणांसाठी सुमारे २६ कोटी २५ लक्ष खर्चसंख्या घटली, पण जोखीम अजूनही कायमदक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


कोरोना उपचार व यंत्रणांसाठी सुमारे २६ कोटी २५ लक्ष खर्च
संख्या घटली, पण जोखीम अजूनही कायम
दक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे
               -  जिल्हाधिकारी शैलेश नवाल

         एप्रिलपासून आतापर्यंत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सुमारे 26 कोटी 25 लाख 44 हजार रूपये निधीतून उपचार, आवश्यक यंत्रणा व इतर सुविधा पुरविण्यात आल्या. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. तथापि, धोका टळलेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांतही नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

          कोरोना प्रतिबंधासाठी एप्रिलपासून जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार व पाठपुराव्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अल्पावधीत अनेक सुविधा उभारण्यात आल्या, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली. ते म्हणाले की,  सुपर स्पेशालिटी रूग्णालयात स्वतंत्र कोविड रूग्णालय अत्यंत कमी काळात उभारण्यात आले. स्थानिक स्तरावर चाचणीची सुविधा असावी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रयोगशाळा उभारण्यात आली. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने ही प्रयोगशाळाही सुरू होऊन स्थानिक स्तरावर तपासणी अहवाल मिळू लागले. पीडीएमसी रूग्णालयातही प्रयोगशाळा सुरू झाली. रूग्णांची वाढती संख्या पाहून शहरात ठिकठिकाणी खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर्स उभारले गेले. खासगी रूग्णालये, हॉटेल आदी ठिकाणीही कोविड उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या. स्वतंत्र विलगीकरण क्षेत्रेही निर्माण करण्यात आली.

         ‘एनएचएम’च्या माध्यमातून औषध, उपचार व विविध यंत्रणेवर गत सात महिन्यांत सुमारे सव्वीस कोटी पंचवीस लक्ष खर्च झाले. औषधांवर यानुसार 4 कोटी 98 लाख 69 हजार, कंझ्युमेबल मेडिसिनवर 1 कोटी 6 लाख 6 हजार 34, पीपीई कीट विथ एन-95 मास्क 3 कोटी 11 लाख 22 हजार, एन-95 मास्क 24 लाख 67 हजार 800, हॉस्पिटल, बेड 80 लाख 48 हजार 384, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम 1 कोटी 14 लाख 475, रॅपीड अँटीजेन टेस्ट 1 कोटी 96 लाख 20 हजार, टेस्टिंग कीटस् (सँपल कलेक्शन कीट) 99 लाख 46 हजार 290, पल्स ऑक्सिमीटर 43 लाख 33 हजार 220, आयटी सिस्टम्स (हार्डवेअर, सॉफ्टवेअर) 8 लाख 7 हजार 551, आयईसी, बीसीसी 29 लाख 74 हजार 267, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन 2 कोटी 60 लाख 93 हजार 328, लॅब, ऑफिस, हॉस्पिटलसाठी लागणारी साधने 72 लाख 8 हजार 402, इन्फ्रारेड थर्मामीटर 8 लाख 94 हजार 950, ह्युमन रिसोर्सेस 3 कोटी 57 लाख 14 हजार, सिव्हिल वर्कवरील अंदाजे 39 लाख 3 हजार 529, डायट 86 लाख 8 हजार 845, तसेच आकस्मिक खर्चातून(कॉन्टिजन्सी) 1 कोटी 88 लाख 68 हजार रू. निधीतून  विविध सुविधा पुरविण्यात आल्या. यात सप्टेंबर महिन्यात रूग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे ठिकठिकाणी बेड व इतर सुविधा पुरविण्यात आला. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक सव्वानऊ कोटी रूपये विविध सुविधांवर खर्च झाले. 

          ही सर्व कामे ‘एनएचएम’च्या माध्यमातून झाली. याबाबतची सर्व खरेदी प्रक्रिया ही शासन निर्णयानुसार हाफकिन महामंडळ, बृहन्मुंबई महापालिका, शासनाचे उपक्रम, केएपीएल व इतर शासनाचे उपक्रमाच्या दरावर तात्काळ पुरवठा करण्यास तयार असणा-या पुरवठाधारकाकडून व ई-निविदा प्रक्रिया राबवून करण्यात आली, अशी माहिती आरोग्य प्रशासनातर्फे देण्यात आली.

                        ०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती