कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी सपोर्ट सेंटर्स - ॲड. यशोमती ठाकूर

नांदुरा बु. येथील विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्नरत
कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी सपोर्ट सेंटर्स - ॲड. यशोमती ठाकूर

         कोरोना प्रादुर्भावात नोकरी गेलेल्या तरूणांना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नांदुरा. बु येथे दिली.
        अमरावती तालुक्यातील नांदुरा बु. येथील रस्ता काँक्रिटीकरण, चौक सौंदर्यीकरण व इतर विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार संतोष काकडे, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
           पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग-व्यवसायांवर मर्यादा आल्या, अनेकांचा रोजगार हिरावल्याने त्यांना गावी परतावे लागले. अशा व्यक्तींना पुन्हा रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येणार आहेत.  बेरोजगारांना मार्गदर्शन, समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण यासह उद्योगांत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येतील. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचाही वापर केला जाईल.  
          नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत  अधिकाधिक उद्योग येऊन स्थानिक स्तरावर मोठी रोजगारनिर्मिती व्हावी यासाठीही प्रयत्नरत असल्याचे सांगून पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण विकासासाठी 'मी समृद्ध तर गाव समृद्ध' ही योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेत मृदसंधारण, शैक्षणिक विकास, सेंद्रिय शेती असे अनेक उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. केवळ पायाभूत सुविधांचीच कामे नव्हे, तर विविध योजनांच्या एकसंध परिणामातून ग्रामीण नागरिकांचे जीवनमान उंचावले जावे यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
           शेती, पशुपालन, अन्य जोडव्यवसाय तसेच अन्य व्यवसायांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना राबवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून आणि अन्य शासकीय योजनांचा लाभ दिल्यास ते निश्चितच समृद्ध होतील. त्यातूनच अमरावती जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या विचाराला चालना देण्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम ही लोकचळवळ व्हावी. त्यासाठी गावोगावी महिला, युवकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
          यावेळी पालकमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व अडचणींचे निराकरण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

 

                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती