Tuesday, October 13, 2020

अमरावती जिल्ह्यातील ग्राम समृद्धी योजनेची आढावा बैठक संपन्न‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही लोकचळवळ व्हावी - ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती जिल्ह्यातील ग्राम समृद्धी योजनेची आढावा बैठक संपन्न
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही लोकचळवळ व्हावी
  - ॲड. यशोमती ठाकूर

      ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या विचाराचे एका लोकचळवळीत रुपांतर व्हावे; अशी अपेक्षा व्यक्त करतानाच राज्यातील जनतेच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करुन करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

       अमरावती जिल्ह्यात ग्राम समृद्धी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ बाबतचा आढावा ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला.  यावेळी मृद, जलसंधारण व रोजगार हमी योजना प्रधान सचिव नंद कुमार, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हास्तरावरील तसेच तालुकास्तरावरील संबंधिक कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

        मेळघाटातील बांबू लागवडीतून मोठे उत्पन्न मिळविणाऱ्या राहू गावाचा विशेष उल्लेख करुन ॲड. ठाकूर म्हणाल्या की, एक गाव अशा पद्धतीने आपली प्रगती करु शकत असेल तर इतर गावेही नक्कीच आपल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग केल्यास समृद्ध होऊ शकतील. यासाठी स्थानिक परिस्थिती, हवामान आणि क्षमतांचा विचार करुन पिके निवडली पाहिजेत. त्यासाठी रोजगार हमी योजना, कृषी विभाग आदी विभागांनी समन्वयाने काम करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि आवश्यक ती मदत पुरवावी. राज्यासाठी पथदर्शी अशा पद्धतीने अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही संकल्पना राबवून यशस्वी करावी.

         ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्या की, योग्य नियोजन करुन दिशा दिल्यास गावोगावी समृद्धी येईल. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सारखा याचा प्रचार, प्रसार व्हायला हवा. ज्याच्याकडे थोडीतरी शेती आहे अशा व्यक्तीला इतरांकडे शेतमजुरीवर जायची गरज पडता कामा नये अशा पद्धतीने नियोजन करावे. योजनेच्या यशस्वीतेसाठी लोकप्रतिनीधींनी सहभागी व्हावे. त्यामुळे दोन-तीन वर्षात गावे निश्चितच समृद्ध होतील. रोहयोच्या माध्यमातून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ची अंमलबजावणी करताना कोविड काळात रोजगाराची मोठी संधी आपण उपलब्ध करुन देऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.

         प्रधान सचिव श्री. नंद कुमार म्हणाले की, कोविड कालावधीमध्ये जेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तेवढ्या तीव्रतेचा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला नाही. त्यामुळे शेतीचे महत्त्व पुन्हा समोर आले आहे. राज्यात अनेक शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि उत्पन्न मिळवून आपली प्रगती केली आहे. त्यांच्या यशोगाथा चित्रफितींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचून त्यांना प्रोत्साहित केल्यास स्वत:चे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करतील. तसेच शेती, पशुपालन, अन्य जोडव्यवसाय तसेच अन्य व्यवसायांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना राबवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून आणि अन्य शासकीय योजनांचा लाभ दिल्यास ते निश्चितच समृद्ध होतील. त्यातूनच अमरावती जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ या विचाराला चालना देण्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

  श्री. नंद कुमार पुढे म्हणाले की, लॉकडाऊन काळात शहरांमध्ये असंघटित क्षेत्रात काम करत असलेले कामगार ग्रामीण भागात परतले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या लोकांना अधिक रोजगार उपलब्ध करुन देता येणे शक्य आहे. शेतकऱ्यांना पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी रोहयोच्या माध्यमातून माथा ते पायथा अशा पद्धतीने जलसंधारणाच्या उपाययोजना मोठ्या प्रमाणात हाती घ्याव्यात. रोहयोतून 275 प्रकारची कामे हाती घेता येतात. त्याशिवाय अभिसरणाच्यातून इतर विभागांकडील 28 योजनांची कामे हाती घेतात. शेतकऱ्यांनी श्रीमंत व्हायचे असेल तर त्यांना प्रेरणा दिली पाहिजे आणि सर्व शासकीय मदत पुरविली पाहिजे. जिल्हा, तालुका आणि ग्रामीण पातळीवरील यंत्रणेने त्यादृष्टीने नियोजनबद्ध काम करावे, असेही ते म्हणाले.

  आजच्या ऑनलाईन बैठकीस ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ अंतर्गत समाविष्ट गावांचे लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...