Friday, October 30, 2020

पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांची पाहणीमुलभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर


पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांची पाहणी
मुलभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत
                    - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

         गावांचा सुनियोजित विकास करण्यासाठी प्रत्येक गावांत मुलभूत सुविधांची निर्मिती होणे आवश्यक असते. रस्ते, शाळा, दवाखाने, पिण्याचे पाणी, विज आदी सुविधांची निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जातो. या निधीतून निर्माण होणाऱ्या मुलभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना आज दिले.
      मोर्शी तालुक्यातील विविध गावांतील विकासकामांची पाहणी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्षपणे केली तसेच विविध दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सांत्वना भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.  उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तालुका कृषी अधिकारी श्रीमती राठोड यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी दौराप्रसंगी उपस्थित होते.
       श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, गावांचा सुनियोजित विकास करण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे विकास आराखडे (डीपी) तयार करुन त्यानुरुप भरीव विकास निधी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गावांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रत्येक गावांत रस्ते, शाळा, दवाखाने, पिण्याचे पाणी, विज, वृक्षारोपण, स्वच्छता, जलसंधारण आदी सुविधांची निर्मिती होणे आवश्यक असते. ही मुलभूत सुविधा निरंतर टिकूण राहण्यासाठी निर्माणाधिन कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी. गावात सलोख्याचे वातावरण राहण्यासाठी समाजमंदीराची निर्मिती करावी. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन नियोजनबध्दरित्या स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करावी. विकास आराखडे तयार करतांना त्याची गुणवत्ता व टिकूण राहण्याची क्षमता तपासून पहावी. शासकीय यंत्रणातील अधिकाऱ्यांनी गावांचा संर्वागिण विकास होण्याच्यादृष्टीने जाणीवपूर्वक कामे करावी. आपण दुसऱ्या ठिकाणावर बदलून गेल्यावर आपण केलेल्या कामाची पावती सदर गावातून उल्लेखली जावी, अशाप्रकारचे विकास कामे तुमच्याहातून घडावीत.
     त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना संकटकाळातही विकासाची प्रक्रिया थांबलेली नाही. अनेकविध कामे पूर्णत्वास जात आहेत. यापुढेही मुलभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. महसूल विभागाने गावातील गोर-गरीब, ज्येष्ठ, वृध्दांची कामे तातडीने पूर्ण करुन द्यावीत. घरकुल योजना, शिधा पत्रिका, आधार कार्ड, सात बारा उतारा, विद्यार्थ्यांचे जातीचा दाखल्यासह इतर महत्वाचे दाखले आदी महसूल विभागाशी निगडीत कामे त्वरेने उपलब्ध करुन द्यावीत. कृषी विभागाने शेतकऱ्यांशी निगडीत विविध योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी. पीक कर्ज, पीक विमा, फळपिक विमा आदी महत्वाच्या विषयासह अतिवृष्टी व किडीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.  कोरोना आजाराचे संकट अजूनही पूर्णपणे समाप्त झाले नाही. गावात सुध्दा कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले आहे. प्रादुर्भाव वाढल्याने, आजाराविषयी गंभीर नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नेहमी सजग राहून लहान बालकासह, वृध्दांची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, नेहमी हाथ धुने, सॅनीटायझर वापरणे आदी उपाययोजना नेहमीच सवयीचा भाग म्हणून अंगिकाराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
       पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज मोर्शी तालुक्याच्या गावांतील विविध दुर्घटनेत व आजाराने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. या कुटुंबांवर दुर्देवाने आपत्ती ओढवली आहे. त्यांना शासनाकडून योग्य ती सर्व मदत मिळवून देण्यात येईल. या कुटुंबातील एक सदस्य म्हणून, बहीण म्हणून आपण सर्वांच्या पाठीशी राहू, अशा शब्दांत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दु:खितांना दिलासा दिला.
         मोर्शी तालुक्यातील मंगरुळ, शिरजगाव, अडगाव, काटसूर, विचोरी, धामणगाव, काटपूर, वाघोली, लेहगाव आदी ठिकाणी पालकमंत्र्यांनी भेटी दिल्या. तेथील विविध विकासकामांची पाहणी त्यांनी यावेळी केली. मुलभूत सुविधा अंतर्गत येणारी विविध विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत, असेही त्यांनी सांगितले. 

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...