पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात सहा लाखांहून अधिक लसी प्राप्त लसीकरण, टॅगींगचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात सहा लाखांहून अधिक लसी प्राप्त
    लसीकरण, टॅगींगचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे
                           -   जिल्हाधिकारी शैलेश नवाल         

       राष्ट्रीय पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात जनावरांमध्ये लाळखुरकत रोग प्रतिबंधासाठी सहा लाख 12 हजार लसी जिल्ह्यात प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पशुधनाच्या शंभर टक्के लसीकरणासह टॅगिंगचे कामही विहित वेळेत करून घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येथे दिले.

       पशुरोग निर्मूलन कार्यक्रम समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. मोहन गोहोत्रे, डॉ. राधेश्याम बहादुरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

       जिल्ह्यात सुमारे 5 लाख 94 हजार 569 एवढे पशुधन असून, पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात सहा लाखांहून अधिक लसी, तसेच 5 लाख 99 हजार 56 टॅग प्राप्त झाले आहेत. संपूर्ण लसीकरणासाठी पुरेशी सामग्री प्राप्त आहे. या कार्यक्रमात विविध 168 संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व तेवढेच प्रायव्हेट व्हॅक्सिनेटरच्या माध्यमातून लसीकरण, टॅगिंग, ईनाफ नोंदणीची व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यात लसीकरण व टॅगिंगचे काम होत आहे. प्रत्येक पशुपालकाच्या सर्व जनावरांचे लसीकरण व टॅगिंग झाले पाहिजे. प्रत्येक जनावराला बारा अंकी बिल्ला लावण्यात यावा. सर्वदूर या कार्यक्रमाची भरीव अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.

        या कार्यक्रमाचे तालुकास्तरावर संनियंत्रण करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली आहे. जिल्हा समितीमार्फत पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशुधन विकास अधिकारी हे संनियंत्रण करत आहेत.

      पशुपालक बांधवांनीही नाव, पत्ता, आधार क्रमांक, जनावरांची संख्या, लिंग आदी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या स्थानिक कार्यालयाला कळवावी व कार्यक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.

                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती