Monday, October 19, 2020

भूजल पातळीत सुधारणेसाठी होणार योजनेची अंमलबजावणी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



राज्यात 13 जिल्ह्यांत अटल भूजल योजना, अमरावतीचाही समावेश
 भूजल पातळीत सुधारणेसाठी होणार योजनेची अंमलबजावणी
-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

        अटल भूजल योजना अमरावती जिल्ह्यासह राज्यात 13 जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सूक्ष्म सिंचनातून भूजल पातळीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला.

         केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अमरावती जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील चांदूर बाजार, वरूड व मोर्शी तालुक्याचा या योजनेत समावेश आहे. भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे तसेच जलसंधारण व कृषी विभागाकडील सूक्ष्म सिंचनाच्या उपाय योजनांद्वारे भूजल पातळीमध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. भूजलाच्या अनियमित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या तालुक्यांतील भूजलपातळीत सुधारणा घडून येण्यासाठी ही योजना परिणामकारक ठरेल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

         हा कार्यक्रम राबविण्यासाठी  राज्य स्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी व इतर तरतुदींबाबत शासनाकडून निर्णय निर्गमित होतील, अशी माहिती ‘भूजल सर्वेक्षण’चे संजय कराड यांनी दिली.

        योजनेत राज्यातील एकूण 73 पाणलोट क्षेत्र, 1 हजार 339 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 443 गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्राकरीता या योजनेंतर्गत केंद्र शासन व जागतिक बँक यांच्याकडून अधिकतम एकूण रूपये ९२५ कोटी ७७ कोटी रूपये एवढे अनुदान पाच वर्षांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये १८८ कोटी २६ लाख रूपये हे संस्थात्मक बळकटीकरण व क्षमता बांधणी या घटकासाठी आहेत. तर अधिकतम रु. ७३७.५१ कोटी रूपये विविध विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या पूर्ततेअंती प्रोत्साहन अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. 

         राज्यातील अतिशोषित, शोषित आणि अंशत: शोषित पाणलोटक्षेत्रांना प्राधान्य देऊन ७३ पाणलोटक्षेत्रातील १४४३ गावांमधून सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

      अटल भूजल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अन्य विभागांमार्फत एककेंद्राभिमुखता (Convergence) करण्यास मान्यता देण्यात आली. या विभागांकडून पूर्ण होणाऱ्या कामांच्या पुर्ततेनंतर केंद्र शासनाकडून प्रोत्साहन अनुदान प्राप्त होईल.  तथापि, पाच वर्षांकरीता योजनेत समाविष्ट विभागांसाठी आवश्यकतेप्रमाणे एकूण रू. ३६८ कोटी ६३ लक्ष रूपयांची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यास करण्यात येणार आहे.

                                                            000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...