Tuesday, October 20, 2020

वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी - राज्यमंत्री बच्चु कडू



वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी - राज्यमंत्री बच्चु कडू

Ø  कृषी विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश

अमरावती, दि. 20 : पानपिंपळी, सफेदमुसळी व पानवेल या ‘आजीबाईच्या  बटव्या’तील अतिशय महत्वाच्या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेत समस्या निर्माण झाल्या आहेत. या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेतील अडथळे, पिक विम्याचे संरक्षण, वनौंषधीचे विपणन, बाजारपेठेची उपलब्धता आणि औषधी पिकांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी विभागीयस्तरावर समिती स्थापन करावी, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी बैठकीत दिले.

आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे, यवतमाळचे नवनाथ कोळमकर, वाशिमचे शंकर तोटावार, अकोलाचे यू. एस. नलावडे, बुलडाणाचे नरेंद्र नाईक, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. के. बी. खोत उपस्थित होते.

बच्चु कडु यांनी वनौंषधी उत्पादनांबाबतचा आढावा घेतांना सांगीतले की, समितीतील तज्‍ज्ञगटानी केलेल्या शिफारशी राज्यस्तरावर सादर करुन वनौंषधी उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील. विविध शारिरीक व्याधींवर गुणकारी असलेल्या वनौंषधी उत्पादनांवर लक्ष देणे गरजेचे आहे. इतर राज्यांमध्ये वनौंषधीचे उत्पादन, विपणन आणि बाजारपेठेची स्थिती याबाबतचा समिती अभ्यास करणार आहे. समितीमध्ये अकोला, अमरावती, बुलडाणा येथील कृषी संशोधक, तज्‍ज्ञांचा समावेश असेल. यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येईल. याबाबतही ही समिती शिफारस करील. समितीमार्फत तज्‍ज्ञांच्या अभ्यास दौऱ्यात वनौंषधी पिकाचे उत्पादन क्षेत्र वाढविणे, तसेच सद्या असलेले अनुदान वाढविण्यासंदर्भात विचार करेल. वनौषधींची शेकडो वर्षांपासूनची उत्पादन परंपरा पहाता त्या वनौषधींना भोगोलिक चिन्हांकन करुन त्याचे महत्‍त्व कायम ठेवण्याबाबतचा अभ्यासही ही समिती करेल.

विभागीय समितीच्या अभ्यासादरम्यान प्रशासनस्तरावर अस्तित्वात असलेल्या योजनांमधून तात्काळ उपाययोजना संबंधित शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देश श्री. कडू यांनी कृषी विभागाला दिले. संबंधित समस्याग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रस्ताव तयार करुन ते शासनास सादर करावे, असेही त्यांनी सांगितले. वनौंषधीवर येणारे रोग, किडीच्या उपाययोजनांची योग्य माहिती नसल्यामुळे पिकांचे नुकसान होते. सद्यस्थितीत अकोला आणि अमरावती येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा घेवून त्यांना यंत्रसुविधा आणि किटकनाशकाबाबत माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

विषमुक्त शेतीच्या समस्यांवर उपाययोजना करावी

‘सेंद्रिय उत्पादन मिळेल’ असा फलक लावून विषारी उत्पादने विकणाऱ्या उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश श्री. कडू यांनी दिले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनतर्फे आयोजित विषमुक्त शेतीविषयी आयोजित बैठकीत दिले.

सेंद्रिय उत्पादनाच्या नावाखाली फळ, भाजीपाला आणि इतर उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अशा प्रकारामुळे प्रामाणिक सेंद्रिय शेती उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जैविक शेतीचा उत्पादनाच्या प्रसाराकरीता प्रत्येक जिल्ह्यात ‘विषमुक्त शेती अभियान पंधरवडा’ राबविण्यात येईल. या माध्यमातून जैविक शेतीचे उत्पादक थेट ग्राहकांशी जोडले जातील. तसेच शेतकऱ्यांना छोटेखानी बाजारपेठ उपलब्ध करुन देता येईल. यात बचतगटांच्या स्टॉलचा देखील सहभाग ठेवावा. पंधरवाड्यादरम्यान शेतकऱ्यांकडून उत्पादित होणाऱ्या पिकांची माहिती घेणे व सेंद्रीय उत्पादक म्हणून शेतकऱ्यांची नोंदणी कृषी विभागाने करावी, असे श्री. कडू यांनी सांगितले. त्याप्रमाणे सेंद्रिय शेती प्रमाणिकरण संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त करण्याची पद्धत सहज आणि सुलभ करण्याबाबत चर्चा करण्यात झाली.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...