जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीची बैठक परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीची बैठक
 परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत
             - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
       जिल्ह्यातील शहरे व गावांत पाटबंधारे प्रकल्पातून पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी तेथील आवश्यकता लक्षात घेऊन आरक्षणाबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. याबाबत आवश्यक त्या प्रस्तावाचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. तथापि, संबंधित प्रशासनानेही याबाबत वेळोवेळी परिपूर्ण माहिती सादर करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.  

       जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बचतभवनात  झाली, त्यावेळी आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आदी उपस्थित होते.

       पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पाणी आरक्षणाबाबतचे प्रस्ताव अनेकदा परिपूर्ण नसतात. त्रुटी दुरूस्त करायला दोन-दोन महिने जातात, हे गंभीर आहे. याबाबत परिपूर्ण माहिती व प्रस्ताव सादर करावेत.   105 प्रादेशिक योजना, महापालिका पाणीपुरवठा योजना व इतरही आवश्यक त्या सर्व योजनांची आवश्यकता लक्षात घेऊन प्रस्ताव द्यावेत व त्याचा नियमित पाठपुरावा व्हावा.  

       अमृत योजनेची कामेही गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांची पाहणीही करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.ज्या त्रुटी आहेत त्या एकदाच तपासून क्लिअर करून प्रस्ताव जावेत, असे श्री. जगताप यांनी सांगितले.
                                          

                        पाणी आरक्षण

सद्य:स्थितीत , जिल्हा आरक्षण समितीकडून नियोजनानुसार अमरावती महापालिका पाणीपुरवठा योजनेचा मूळ स्त्रोत उर्ध्व वर्धा धरण असून 2020-21 साठी 46 दलघमी पाणी, 156 गावे व 2 शहरे संयुक्त पाणीपुरवठा योजना व 79 गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा स्त्रोत शहानूर प्रकल्प व 16.81 दलघमी पाणी, 105 गावे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा स्त्रोत पूर्णा मध्यम प्रकल्प असून, 3.75 दलघमी पाणी, हिवरखेड पाणीपुरवठा योजनेसाठी अप्पर वर्धामधून 0.30 दलघमी, लोणी जरूड बेनोडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी अप्पर वर्धाकडून 0.283 दलघमी, लोणी स्वतंत्र योजनेसाठी धवलगिरीतून 0.25 दलघमी, पुसला योजनेसाठी पंढरी प्रकल्पातून 0.35 दलघमी, वरूड शहर योजनेसाठी अप्पर वर्धातून 2.6 दलघमी, मोर्शीसाठी  अप्पर वर्धातून 3.50 दलघमी, तिवस्यासाठी अप्पर वर्धातून 0.30, शेंदुरजना घाटसाठी पुसली लघुप्रकल्पातून 2.33 दलघमी, नांदगाव खंडेश्वरसाठी चांदी प्रकल्पातून 1.2 दलघमी, धामणगाव रेल्वेसाठी निम्न वर्धातून 3.5 दलघमी, अचलपूरसाठी चंद्रभागा प्रकल्पातून 19.08 दलघमी, चांदूर बाजारसाठी पूर्णा मध्यम प्रकल्पातून 1.10 दलघमी, चांदूर रेल्वेसाठी मालखेड प्रकल्पातून 1.93 असे पाणी आरक्षण आहे.

                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती