Monday, October 26, 2020

भुखंड मिळूनही उद्योग न उभारणाऱ्यांना नोटीसा द्याव्यात - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर


औद्योगिक वसाहत विकासाबाबत बैठक
औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी एकसंध प्रयत्नांची आवश्यकता
 भुखंड मिळूनही उद्योग न उभारणाऱ्यांना नोटीसा द्याव्यात
- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

        जिल्ह्यातील मुख्यालयासह विविध तालुक्यांतील औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी एकसंध प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी सर्वदूर औद्योगिक विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार कृषी प्रक्रिया उद्योगासह विविध बाबींचा समावेश करून परिपूर्ण आराखडा तयार  करावा,  असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. औद्योगिक वसाहतीत भूखंड मिळूनही अनेक वर्षे उद्योग सुरू न करणाऱ्यांना नोटीसा द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

        जिल्हाधिकारी कार्यालय येथे  नांदगावपेठ, तसेच इतर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील प्लॉटवाटप व मूलभूत सुविधांबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी जि.प. सभापती जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी राजाराम गुठळे, कार्यकारी अभियंता आर. के. बन्सोड, उपअभियंता एस. डी. देशमुख, क्षेत्र व्यवस्थापक आर. डी. ठाकरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

        पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, तालुका ठिकाणच्या वसाहतीत उद्योग उभे राहावेत यासाठी ऍग्रो झोन तयार करून कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावे. जिथे केवळ भूखंड आरक्षित करून ठेवले व प्रत्यक्षात उद्योगच सुरू झाले नसतील, अशांना नोटीसा द्याव्यात. औद्योगिक वसाहतीलगतच्या वन विभागाच्या जागेवर वनोद्यानाची निर्मिती करावी. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अनेकविध उपक्रम राबवावेत. नांदगावपेठ वसाहतीत अतिरिक्त क्षेत्र सुरू केले गेले. टेक्सटाईल पार्कमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. तेथील गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टीने 'विदर्भ ऍडव्हानटेज'सारखे उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

     भारत डायनॅमिक्सला सुमारे २२५ हेकटर जागा देण्यात आली आहे. तेथील कारखान्याच्या उभारणीबाबत पाठपुरावा करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

     औद्योगिक वसाहतीतील उद्योग विकासाच्या दृष्टीने तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवणे व दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेवून आराखडा करणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर सादरीकरण करावे. याबाबत स्वतंत्र बैठक नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

      अमरावती वसाहतीत ४०० उद्योग सुरू आहेत.  वाणिज्यिक व निवासी ५५ भूखंड उपलब्ध आहेत, असे श्री. गुठळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...