प्रभावी कार्यासाठी आंतरिक संवाद महत्वपूर्ण- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पीआरसीआयतर्फे इंटरनल कम्युनिकेशन ट्रेंडस् 2020 विषयी वेबिनारमध्ये चर्चा
   प्रभावी कार्यासाठी आंतरिक संवाद महत्वपूर्ण
- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
           डिजीटल साधनांनी संवादाच्या प्रक्रिया विविध स्तरांवर बदल केले आहेत. आंतरसंवादासाठीही डिजीटल माध्यमांचा मोठा वापर होत आहे. हे बदल सकारात्मकपणे स्वीकारून आंतरसंवाद दृढ केला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रातील संस्थेच्या व कार्य- आस्थापनांच्या प्रगतीसाठी सहकाऱ्यांमधील आंतरिक संवाद ही महत्वपूर्ण बाब आहे. या दशकात तंत्रज्ञानाने घडवलेले बदल सुसंवादासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.  

             पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीआरसीआय) अमरावती चॅप्टरतर्फे इंटरनल कम्युनिकेशन ट्रेंडस-2020 या विषयावर झूमच्या माध्यमातून राष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे रिजनल डायरेक्टर विजय सातोकार, झी 24 तासचे आऊटपूट एडिटर अभिजित कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ‘पीआरसीआय’चे चेअरमन एमीरटस एम .बी.जयराम, नॅशनल प्रेसिडेंट टी. विनयकुमार, सेक्रेटरी जनरल यु. एस. कुट्टी, सुंदरम पिल्लाई,  अन्नू रायना, अंकिता राव, डॉ. लता टी. एस., वेस्ट झोनचे चेअरमन अविनाश गवई, डॉ. आलोक जत्राटकर, विदर्भ प्रदेश समन्वयक राजेश बोबडे यांच्यासह कौन्सिलचे देशभरातील सदस्य व पीआर क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

          पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात निर्माण झालेली परिस्थिती हाताळताना आंतरसंवाद कायम राखण्यासाठी विविध संवाद माध्यमांचा मोठा उपयोग झाला. दक्षतेसाठी अनेक कार्यालयांतून वर्क फ्रॉम होम सुरु असताना विविध कामांना चालना देताना संवादासाठी डिजीटल माध्यमांमुळे कामात सातत्य राखता आले. अंगणवाडी सेविका, आशा सेविका अशा विविध घटकांशी थेट संवादाची सुविधा वापरता आली. अनेक महत्वाच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाल्या. 2020 ने निर्माण केलेले आंतरसंवादाचे नवे प्रवाह भविष्यातील सुदृढ सुसंवादासाठी मूलगामी ठरतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.  

           दिव्य मराठीचे राज्य संपादक श्री. आवटे म्हणाले की, आंतरसंवाद ही जनसंवादाची गुरुकिल्ली आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी आंतरसंवाद अत्यंत महत्वपूर्ण असून प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोविड साथीने निर्माण केलेल्या परिस्थितीत आंतरसंवाद प्रक्रियेवर परिणाम झाले. आंतरसंवादात भावनिकता महत्वाची असून, व्यक्त होण्याइतकेच ऐकणे व जाणून घेणेही महत्वाचे आहे. उत्तम आंतरसंवादाच्या साखळीतून लोकसंवाद प्रभावी होऊ शकतो.  राष्ट्रपिता महात्मा गांधी हे थोर संवादगुरु होते. मिस इन्फर्मेशन व डिसइन्फर्मेशन या संकल्पनाबाबत सोदाहरण सांगताना श्री. आवटे यांनी फोर-डी व इतर नव्या माध्यमांचे महत्वही त्यांनी  विशद केले. ग्राऊंड कॉमेंट, रिझल्ट ओरिएंटेड, इमोशनल कॉमेंट, ॲनालिटीकल ॲप्रोच व ट्रेडसेट अशी ‘ग्रेट’ या शब्दाची उकल करत या बाबी यशस्वी कार्यप्रणालीसाठी उपयुक्त असल्याचेही श्री. आवटे यांनी सांगितले.

          झी 24 तासचे आऊटपूट एडिटर श्री. कांबळे म्हणाले की, कुठल्याही संस्थेचे यशापयश हे संवादावर अवलंबून आहे.  यंत्रणेत काम करताना कार्यकारी, तसेच तांत्रिक या दोन्ही बाजू सांभाळताना आंतरिक संवाद अत्यंत महत्वाचा ठरतो. कार्यक्षमता वाढविण्यासाठी व सुदृढ वातावरणनिर्मितीसाठी तो आवश्यक आहे. आंतरसंवादामुळे संवादाची निरंतर प्रक्रिया दृढ होत असल्याचे ते म्हणाले. विविध संस्थांत काम करताना आलेले अनुभवही त्यांनी यावेळी सांगितले.

         डॉ. विजय सातोकार म्हणाले, कोविडच्या काळात आंतरसंवाद टिकवून ठेवण्यासाठी डिजीटल साधनांना महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, परस्पर संवादात गैरसमजांचे अडथळे येऊ नयेत, यासाठी सुस्पष्टता आवश्यक आहे. प्रत्यक्ष संवाद प्रभावी असतो. मात्र, आंतरसंवादातून लोकसंवादाची साखळी मजबूत करण्यासाठी डिजीटल माध्यमे पुढील काळात महत्वपूर्ण ठरतील. ‘पीआरसीआय’चे चेअरमन एमीरटस एम .बी. जयराम यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.

         चॅप्टरतर्फे चेअरमन हर्षवर्धन पवार, व्हाईस चेअरमन डॉ. विलास नांदूरकर, कोषाध्यक्ष भुषण पुसतकर, सचिव फुलसिंह राठोड, सहसचिव विजय राऊत, सदस्य डॉ. लोभस गडेकर, गौरव इंगळे, सागर राणे, योगेश गावंडे, प्रणाली जाधव, रुपल जैन, प्रशांत राठोड, राजश्री चोरपगार, दिपाली खडके, अनिल महल्ले आदी उपस्थित होते.

        श्री. पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नांदूरकर यांनी आभार मानले. कु. जाधव कु. जैन यांनी सुत्रसंचालन केले.

 

                                                000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती