लोकसभा निवडणूक-2024 मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 





लोकसभा निवडणूक-2024

मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 18 (जिमाका):  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आज निवडणूक विषयक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी धारणी रिचर्ड यान्थन, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजय जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी कैलास घोडके तसेच नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. समाजातील सर्वच घटकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावे. निवडणूका हा लोकशाहीचा उत्सव असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, यासाठी दिव्यांग, महिला, युवक, तृतीयपंथी, जेष्ठ नागरिक सर्वांनाच मतदान करण्यासाठी आवाहन करावे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार संघामध्ये दिव्यांग, महिला यांच्यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार पेटी ठेवावी, असेही ते यावेळी म्हणाले.

 

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये आणि जेष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावे, यासाठी जेष्ठ नागरिकांना घरातून मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. निवडणूक कार्यासाठी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारीबाबत सीव्हीजील ॲपच्या माध्यमातून कार्यवाही आदी बाबींवर भर देण्याच्या सूचना श्री. कटियार यांनी यावेळी दिल्या.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती