अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करा समाज कल्याण विभागाचे आवाहन ; 31 मार्च अंतीम मुदत

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करा

समाज कल्याण विभागाचे आवाहन ; 31 मार्च अंतीम मुदत 


       अमरावती, दि.13 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता 5 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क या विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. त्यानुसार सर्व शाळांनी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे.


उपरोक्त नमूद केलेल्या सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांची महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज

नोंदणी करणेकरीता पुढीलप्रमाणे कार्यप्रणाली अवलंबविण्याच्या सूचना विभागाव्दारे देण्यात आल्या आहेत. महाडीबीटी प्रणालीची वेब लिंक https://prematric.mahait.org/Login/Login याप्रमाणे असून महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जाच्या नोंदणीसाठी मुख्याध्यापकांनी प्रथम लॉगीन तयार करावे, त्यानंतर  शाळेच्या मुख्याध्यापकांनी युजर आयडीमध्ये Pre_SE२७XXXXXXXX_Principal आणि Pass@१२३ टाइप करून लॉगीन करावे. शाळेची, मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती अद्ययावत करणे यासाठी शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करावे.


वरील पद्धतीचा अवलंब करून सर्व शासन मान्यता प्राप्त शाळांची नोंदणी महाडीबीटी पोर्टलवर करावी. तसेच वरील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करणेकरीता विभागातील सर्व शासन मान्यता प्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रादेशिक कार्यालयामार्फत यापूर्वीच जाहीर आवाहन करण्यात आले होते. परंतू, दि.०५ मार्च, २०२४ रोजीचे महाडीबीटी डॅशबोर्डचे अवलोकन केले असता महाडीबीटी पोर्टलवर विभागातील एकूण १०२० शाळांनीच नोंदणी केली असल्याचे दिसून आले आहे. सर्व योजने अंतर्गत एकूण 924 विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी झाली आहे.


तेव्हा विभागातील सर्व शासन मान्यता प्राप्त शाळांना कळविण्यात येते की, सर्व शाळांनी 31 मार्च, 2024 पर्यंत शाळांची नोंदणी महाडीबीटी पोर्टलवर करण्यात यावी. तसेच ऑनलाईन करण्यात आलेल्या सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  


             00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती