Monday, March 18, 2024

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रशासन व पोलीस विभागाचा आढावा; लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करा- सौरभ कटियार

 






जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रशासन व पोलीस विभागाचा आढावा;

लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करा- सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 18 (जिमाका):  निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. सर्व विभागांनी समन्वय साधून निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज दिले.

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी प्रशासन व पोलीस विभागाचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, मनपा आयुक्त देवीदास पवार, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी धारणी रिचर्ड यान्थन, पोलीस उपायुक्त सागर पाटील, कल्पना बरावकर, गणेश शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच पोलीस विभाग व प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता शनिवार पासून लागू झाली असून 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय आवश्यक आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. निवडणूक कामातील टाळाटाळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. सर्व विभागानी समन्वय साधून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक संदर्भातील कामे पार पाडावी. यासाठी संबंधित विभागासोबत सतत संपर्कात रहावे. उमेदवारांनी रॅली, सभा व इत्तर कामासाठी सादर केलेल्या परवाने तपासणी करुन तातडीने उपलब्ध करुन द्यावे. आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन होईल, कोठेही त्याचा भंग होणार नाही यांची दक्षता जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने घ्यावी, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

 

पोलिस आयुक्त श्री. रेड्डी म्हणाले की, सर्व पोलीस अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त क्षेत्रामध्ये सतत पेट्रोलिंग चालू ठेवावी. अप्रिय घटना त्वरित वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेक पोस्टवर अधिकाऱ्यांनी जास्त लक्ष केंद्रीत करून काही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा. समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेकन्यूजवर पोलीसांच्या सायबर विभागाने बारकाईने लक्ष द्यावे. स्ट्रॉगरुम, मतदान केंद्र, चेकनाके आदी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने विशेष काळजी घ्यावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आली. प्रशासन व  पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले.

 

0000000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...