Friday, January 31, 2025

DIO NEWS AMRAVATI 31.01.2025








 

पारदर्शी, गतीमान प्रशासनाचा संकल्प करा

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

*शिक्षण, आरोग्यावर प्राधान्याने निधी देणार

अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत विकासाचे ध्येय, जिल्ह्याचा संकल्प आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल. यासाठी सर्वांनी गतीमान, पारदर्शी प्रशासनाचा संकल्प करावा. असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन भवन येथे आज आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.  या़त जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत विविध विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली, तसेच नाविण्यपूर्ण प्रकल्पांवरही चर्चा झाली. तसेच जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी सात दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

खासदार बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, सुलभा खोडके, रवी राणा, प्रवीण तायडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, राजेश वानखडे, केवलराम काळे, गजानन लवटे, प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत प्रास्ताविकेत जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

 बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतर्गत सन 2024-25 मधील जानेवारीअखेर झालेल्या 330.72 कोटी रुपयांच्या खर्चाला बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 56.55 कोटी रुपये, तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 40.99 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विविध विकासकामांना चालना देण्यासाठी भरीव तरतुद करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी 21.45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून 83 कामे पूर्ण होणार असून 40.31 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होतील. इतर जिल्हा मार्गांसाठी 14.14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ज्यामुळे 28 किलोमीटर रस्त्यांची सुधारणा होईल. जिल्ह्यातील 14 नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या विकासासाठी 11.83 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्युत विकासासाठी 30 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ऊर्जा उपलब्धता सुनिश्चित होईल. प्राथमिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी निधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यावेळी पुढील वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पावरही बैठकीत चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 417.78 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 102 कोटी रुपये, तर आदिवासी उपयोजना घटक कार्यक्रमासाठी 117.38 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.

महानगरपालिका स्थानिक स्वराज्य केंद्र व राज्य शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वपूर्ण आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरात सर्वत्र लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येतील. चिखलदरा स्कायवॉकच्या काम गतीने पूर्ण करण्यात येईल. मंजूर कामांवरील निधी 31 मार्च 2025 च्या आत खर्च करावा. जिल्हा शल्य चिकित्सा तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अचलपूर येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी अहवाल सादर करावा. मेळघाटातील दुर्गम 22 गावांमध्ये वीज प्रश्न असल्याने याठिकाणी वीज पुरवठा सुरूळीत सुरू रहावा, यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महापालिकेसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी मनपा आयुक्त यांनी इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करुन कार्यवाही करावी. तसेच महानगरपालिकेच्या शाळा अत्याधुनिक करण्यावर भर द्यावा. मनपा शाळा डिजिटल तसेच आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त व्हाव्यात यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात अला. शाळा, तसेच आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष द्यावे, असे पालकमंत्री म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जिल्ह्यातील नदी, उपनद्या, नाले खोलीकरण करून पाणी जिरवण्यावर भर द्यावा. उपसा करताना निघालेली वाळू शासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वापरावी. गाव तेथे स्मशानभूमी ही योजना प्रत्येक गावात असणे आवश्यक आहे. तसेच मोर्शी मतदारसंघातील वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी अंबादेवी आणि एकवीरा देवीचे आज सकाळी दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. वैद्य यांनी श्री. बावनकुळे यांचा हनुमानाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. श्री बावनकुळे यांनी क्रीडापटूंची माहिती घेऊन कौतुक केले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एकनाथ हिरुळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी महात्मा गांधी आणि स्व. एकनाथ हिरुळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी कंवर नगर येथील महानुभव आश्रमाला भेट दिली. आश्रमाच्या वतीने त्यांचा  यावेळी सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी आज सकाळी भेट दिली. समाधीस्थळी त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच समाधीस्थळाचा विकास ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनीसांगितले. यावेळी आश्रमाच्यावतीने श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

00000

सुधारित

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा शनिवारी दौरा

अमरावती, दि. 31 (जिमाका) : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर  शनिवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. भोयर यांचे शनिवारी दुपारी 12 वाजता अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख विज्ञाननगरी, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथील 52 व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता जोग स्टेडीयमजवळ वसंत हॉल येथे पोलीस परिवारासोबत संवाद साधतील. दुपारी 1.45 ते 2.30 वाजता मिटींग हॉल, पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर येथे अमरावती जिल्ह्यातील पोलीस विभागासमवेत आढावा बैठक. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे म्हाडाच्या प्रादेशिक विभाग बैठकीस उपस्थिती. दुपारी 4 वाजता जनसंपर्क कार्यालय, कॅम्प रोड, येथे प्रविणभाऊ पोटे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 4.30 वाजता शिखर एज्युकेअर, पोरवाल पेंट हाऊस जवळ, विजय कॉलनी येथील शिखर एज्युकेअर या संस्थेस सदिच्छा भेट. सायंकाळी  5 ते 6.30 वाजता राखीव. सोयीने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातंर्गत

तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नियुक्तीबाबत सूचना

            अमरावती, दि. 31 (जिमाका): जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, गर्ल्स हायस्कूल चौक, महिला व बालविकास भवन अमरावती अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात दोन महिन्यासाठी  जिल्हा बाल संरक्षण कक्ष यामधील बाह्यक्षेत्र कार्यकर्ता 2 पदे व डाटा एन्ट्री ऑपरेटर 1 पद व रेल्वे चाईल्ड लाईन सुपरवायझर 1 पद व केस वर्कर 1 पद या रिक्त पदांसाठी मिशन वात्सल्य मार्गदर्शक सूचना व चाईल्ड हेल्पलाईन मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुदप्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांनी दि. 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात आपले अर्ज आवश्यक कागदपत्रासह सादर करावे. विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

00000

अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांचा सोमवारी दौरा

अमरावती, दि. 31 (जिमाका): अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ सोमवार, दि. 3 फेब्रुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

            दौऱ्यानुसार, श्री. अडसूळ यांचे सोमवारी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 12 ते 2 पर्यंत शासकीय विश्रामगृह येथे नियोजित प्रकरणांवर सुनावण्या होतील. दुपारी 2 ते 3 राखीव. दुपारी 3 ते 4 पर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या संघटना, व्यक्तींची निवेदने स्वीकरणे व चर्चा होईल व सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण करतील.

00000



चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजोपयोगी कार्यासाठी केला मुकुट अर्पण !

अमरावती, दि. 31 (जिमाका): महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे आज सकाळी भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी सोनेरी मुकुट देऊन स्वागत केले होते. मात्र भाजपाला मिळालेला विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठापूर्वक परिश्रमातून मिळाला असल्याने आपण हा सोनेरी मुकुट भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना भेट म्हणून देत आहोत असे स्पष्ट करून चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मुकुट शहर भाजपाच्या स्वाधीन केला. या मुकुटातून येणाऱ्या आर्थिक रक्कमेतून समाजोपयोगी उपक्रमात ही रक्कम खर्च करावी असे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी अमरावती भाजपाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचा केलेला हा गौरव सामान्य कार्यकर्त्यांना सुखावून गेला आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक आगळावेगळा आदर्श सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष प्रस्तुत केला.

00000

 

 

 

Thursday, January 30, 2025

DIO NEWS AMRAVATI 30.01.2025

 

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज दौरा

अमरावती, दि. 30 (जिमाका) : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 31 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देतील. सकाळी 10.30 वाजता इर्विन चौकातील स्वागतास उपस्थित राहतील. सकाळी 10.30 वाजता श्री अंबादेवी मंदिर येथे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी 11.00 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी भेट देतील. सकाळी 12.00 वाजता शंकरनगर येथे स्वातंत्र्यसैनिक स्व. एकनाथ हिरूळकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. दुपारी 12.30 वाजता कंवरनगरातील महानुभाव आश्रमाला भेट देतील. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे मिट द प्रेस होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1.30 वाजता जिल्हा विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी 3 वाजता विभागीय आयुक्त यांचे सादरीकरण आणि आढावा, दुपारी 4.30 वाजता नोंदणी उपमहानिरीक्षक यांचे सादरीकरण व आढावा, सायंकाळी 5 वाजता भूमी अभिलेख उपसंचालक यांचे सादरीकरण व आढावा घेतील. सायंकाळी 6 वाजता विश्रामगृह येथे राखीव राहिल. रात्री 8.30 वाजता गृहभेटी आणि त्यानंतर रात्री 10 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रस्थान करतील.

00000

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा दौरा

अमरावती, दि. 30 (जिमाका) : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके सोमवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. उईके यांचे सोमवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह येथे शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित सत्कार समारंभास उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता सामाजिक न्याय भवनात जिल्ह्यातील मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची आढावा बैठक घेतील. दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद होणार होणार आहे. दुपारी 2.30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी संपर्क क्रमांक जाहिर

अमरावती, दि. 30 : कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणाऱ्या नागरीकांनी दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक भासल्यास नियंत्रण कक्षाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा 2025चे आयोजन करण्यात आले आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी जात आहेत. आपात्कालीन स्थितीत प्रयागराज येथील कंट्रोल रुम दुरध्वनी क्रमांक 0522-2237515 आहे. तसेच मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई क्रमांक 022-22027990 तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती दुरध्वनी क्रमांक 0721-2662025 आहे. प्रयागराज येथे दर्शनासाठी गेलेल्या नागरीकांनी आवश्यकता भासल्यास सदर क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

माजी सैनिकांसाठी नोंदणीची अंतिम मुदत 1 मार्च पर्यंत

अमरावती, दि. 30 (जिमाका)  : सर्व माजी सैनिक, विधवा आणि त्यांच्या अवलंबितांना महासैनिक पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.  नोंदणीची अंतिम तारीख 1 मार्च 2025 असून, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. महासैनिक पोर्टल (mahasainik.maharashtra.gov.in)  ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.  या पोर्टलच्या माध्यमातून सैनिक कल्याण विभाग आणि केंद्रीय सैनिक बोर्डाच्या योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. तसेच, स्पर्श प्रणालीमधील निवृत्ती वेतनविषयक माहिती तत्परतेने सोडवण्यासाठी मदत होणार आहे , असे अमरावती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सेना मेडल (निवृत्त) मेजर आनंद पाथरकर  यांनी सांगितले.

नोंदणीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, डिस्चार्ज बुक, पी.पी.ओ., पेन्शन पासबुक, ई.सी.एच.एस. कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक, शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक आहेत. नोंदणी शुल्क 100 रुपये असून ते ऑनलाईन पद्धतीने भरावे. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक आणि स्पष्ट असणे आवश्यक आहे. कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करावी लागतील.  नोंदणीनंतर अर्जाची प्रिंट काढून, मूळ कागदपत्रांसह पडताळणीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे  भेट देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा.

00000



स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान, कुष्ठरुग्ण शोध मोहिमेचे उद्घाटन

अमरावती, दि. 30 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरूवार, दि. 30 जानेवारी विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयात कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात आला. यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान आणि कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमेला सुरवात करण्यात आली.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड यांनी क्षयरोगाविषयी माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी विद्यार्थ्यांनी रुग्ण तपासणीमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असे आवाहन करून अभियान आणि मोहिमेचे उद्घाटन केले. प्राचार्या प्रीती पवार यांनी पपेट शोतून कुष्ठरोगाविषयी जनजागृती केली. प्राचार्य डॉ. संजय चोपकर यांनी विद्यार्थी अभियानात सक्रिय सहभाग घेतील, असे सांगितले. संचालक डॉ. रवींद्र वाघमारे यांनी कुष्ठरोगाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले.

सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. कुष्ठरोग आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार यांनी प्रास्ताविक केले. अवैद्यकीय पर्यवेक्षक गजानन पन्हाळे व डॉ. श्रद्धा यादगिरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी अवैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग, कुष्ठरोग तंत्रज्ञ रितेश ठाकरे, श्री. कदम, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकाचे डॉ. विनंती नवरे, अवैद्यकीय सहाय्यक रमेश सोनार, जोसेफ पीटर, अविनाश इंगळे, अतुल धुळे, सीमा केने, मंजुषा गावंडे, कविता दहिवले, शहरी आरोग्य केंद्र येथील डॉ. कृष्णकांत पाथरे यांनी पुढाकार घेतला.

00000

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही  दिन

         अमरावती, दि. 30 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन, सोमवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000





जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली

        अमरावती, दि. 30 (जिमाका) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळून आज जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

      नायब तहसिलदार प्रवीण ढोले यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी दोन मिनीटे मौन पाळून आदरांजली वाहिली.

00000

           

Wednesday, January 29, 2025

DIO NEWS AMRAVATI 29.01.2025

 



जिल्हा परिषदेत प्रजासत्ताक दिन साजरा

        अमरावती, दि. 29 (जिमाका): प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर संविधान शपथ व तंबाखूमुक्त शपथ घेण्यात आली. श्रीमती महापात्र यांनी अधिकारी व कर्मचारी यांना तंबाखूमुक्त भारतचे महत्त्व विषद केले. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मुखाचा कर्करोग यासारखे अनेक दुर्धर आजार होत असल्याचे सांगितले. प्रदूषणाविषयी प्रत्येक व्यक्तीने स्वत:पासून बदल घडवून आसपासच्या परिसरामध्ये, समाजातील लोकांमध्ये बदल घडवावा. त्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये, असा संदेश दिला. प्लास्टिक बॅगमुळे शेतपिकांवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

00000




रोजगार मेळाव्यात 156 उमेदवारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 29 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, तसेच स्वराज्य सुशिक्षित बेरोजगार अभियंता संस्थेतर्फे मंगळवार, दि. 28 जानेवारी रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 156 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

कौशल्य विकासचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य राम मेघे इंजिनिअरींग कॉलेजचे संजय देशमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी अजय गोंदणे, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, डॉ. संदीप देवळे, कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

रोजगार मेळाव्यात तसेच पिपल त्रि वेन्चेरच्या वैष्णवी शर्मा, जाधव ग्रुप ऑफ कंपनीजचे चंद्रकांत वाघमारे, रेडीयंट सुपरस्पेशालीस्ट हॉस्पीटलचे श्री. बाळापुरे, संसुर श्रुष्टीच्या जयश्री महल्ले, सत्या मायक्रो फायनान्सचे पंकज बागडे, आसपा ग्लोबलच्या दिव्या राऊत, एलआयसीच्या महिमा दुबे, धूत ट्रान्समिशनचे विजय तांदळे, युनिव्हर्सलचे सुहास पाली, तिवारी रिअलिटीचे एजाज अहमद, प्रथमेश एज्युकेशन राळेगावचे संदीप तंतरपाले, टाटा स्ट्राईव्हचे राजेश सोनेकर उपस्थित होते. या मेळाव्यात उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

बेनोडा भिमटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील मेळाव्याला 402 उमेदवारांनी नोंदणी केली. यापैकी 380 उमेदवारांनी सहभागी होऊन मुलाखती दिल्या. प्रांजली वारस्कर यांनी प्रास्ताविक केले. दिक्षा शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली पवार यांनी आभार मानले.

00000

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा शनिवारी दौरा

अमरावती, दि. 29 (जिमाका) : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर  शनिवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. भोयर यांचे शनिवारी दुपारी 12 वाजता अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख विज्ञाननगरी, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथील 52वी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता जोग स्टेडीयमजवळ वसंत हॉल येथे पोलीस परिवारासोबत संवाद साधतील. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे म्हाडाच्या प्रादेशिक विभाग बैठकीस उपस्थित राहून सोयीने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

ओबीसी महामंडाळाची एक रक्कमी परतावा योजना

        अमरावती, दि. 29 (जिमाका): ओबीसी महामंडाळाच्या थकीत कर्जप्रकरणी संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यासाठी एक रक्कमी परतावा योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडाळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. खोडे यांनी केले आहे.

00000


Tuesday, January 28, 2025

DIO NEWS AMRAVATI 28.01.2025


 

हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मानित

        अमरावती, दि. 28 (जिमाका): सहायक संचालक नगर रचना मूल्यांकन कार्यालयात कार्यरत नगर रचनाकार प्रविण पेटे यांची ‘स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार दि. 31 जानेवारी रोजी पुणे येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

00000


प्रजासत्ताक दिनी कुष्ठरोग जनजागृतीपर प्रतिज्ञा

अमरावती, दि. 28 (जिमाका): प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावती जिल्हा अंतर्गत शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सर्व संस्था, शाळा, महाविद्यालय, कार्यालय इत्यादी ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुष्ठरोग जनजागृती पर प्रतिज्ञा  यावेळी घेण्यात आली. शासकीय कर्मचारी, अशासकीय कर्मचारी, खाजगी व्यावसायिक तसेच नागरिकांनी कुष्ठरोग प्रतिज्ञेचे वाचन केलेले आहे.

संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला समान संधी, समान हक्क, समान अधिकार आहेत. कुष्ठरुग्णांना समानतेची वागणूक देण्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. लवकर निदान, लवकर उपचार आणि बहुविध औषधोपचार हाच या आजारावर उपाय असून सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध आहेत. अशी माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहायक संचालक डॉ.पूनम मोहोकार यांनी दिली.

0000



स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान  जिल्हा समन्वय समिती सभा संपन्न

अमरावती, दि. 28 (जिमाका):  राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा कार्यक्षेत्रामध्ये दि. 31 जानेवारी  ते दि. 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा नुकतीच पार पडली.

स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान विशेष मोहीम राबविण्यासाठी व संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांनी समन्वयाने कार्य करावे. तसेच हे अभियान राबविण्यासाठी अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य यांनी कुष्ठरोग जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करावी, असे आवाहन  श्रीमती संजिता महोपात्र यांनी केले आहे.

स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान विशेष मोहीम राबविण्यासाठी गावनिहाय, वार्डनिहाय नियोजन करण्यात आले आहे. यावेळी आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी हे घरोघरी प्रत्यक्ष भेटी देवून सर्वेक्षण करणार आहेत. कुष्ठरोग लक्षणे असणाऱ्या संशयितांची नोंद घेऊन पुढील तपासणी, निदान निश्चिती व त्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी बहुविध औषधोपचार करणार असल्याबाबतची माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहायक संचालक डॉ.पूनम मोहोकार यांनी दिली.

निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रविण पारिसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. जोगी, डॉ. विशाल काळे, तपोवन, कोठारा, निंभोरा येथील अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे प्रतिनिधी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, नर्सिंग कॉलेज व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच कुष्ठरोग विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

00000

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवारी दौरा

अमरावती, दि. 28 (जिमाका) : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 31 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे यांचे शुक्रवारी सकाळी 10 वाजता श्री अंबादेवी मंदिर येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता मिट द प्रेस होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 वाजता जिल्हा विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी 3 वाजता विभागीय आयुक्त यांचे सादरीकरण आणि आढावा, दुपारी 4.30 वाजता नोंदणी उपमहानिरीक्षक यांचे सादरीकरण व आढावा, सायंकाळी 5.15 वाजता भूमी अभिलेख उपसंचालक यांचे सादरीकरण व आढावा घेतील. रात्री 8 वाजता गृहभेटी आणि त्यानंतर रात्री 10 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रस्थान करतील.

00000


Monday, January 27, 2025

DIO NEWS AMRAVATI 27.01.2025

 दर्यापूर वसतिगृहात संविधानाबाबत विविध स्पर्धा

 

अमरावती, दि. 27 : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दर्यापूर येथील शासकीय वसतिगृहात विविध स्पर्धा पार पडल्या. घर घर संविधान अभियानांतर्गत दर्यापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आणि १२५वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे भारतीय संविधानावर आधारीत निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि देशभक्तीपर आधारीत गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.

 

000000

 

दिव्यांग व्यक्तींनी फिरत्या वाहनावरील दुकान

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 27 : दिव्यांग व्यक्तींच्या सबळीकरणासाठी फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

हरीत ऊर्जेवर चालणारे फिरत्या वाहनावरील दुकान योजनेची अंमलबजावणीची दिव्यांग वित्त व विकास महामंडळ करणार आहे. योजनेतून दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक, सामाजिक पुनवर्सन करणे, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांचा परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करण्यात येणार आहे.

 

योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी register.mshfdc.co.in पोर्टलवर 6 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

 

00000

--

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...