मेंढपाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत
- जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 6 (जिमाका): परराज्यातील मेंढ्यांना जिल्ह्याच्या हद्दीत निर्बंध घालणे आणि लसीकरण प्रभावीपणे राबवून आजार संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात उपाययोजना करण्यात येतील. तसेच मेंढपाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मेंढपाळांच्या प्रश्नाबाबत शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, जिल्हा प्रशासनातर्फे मेंढपाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जिल्ह्यात इतर राज्यातील जनावरे येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे प्राधान्याने परराज्यातून आलेल्या मेंढीसह इतर जनावरांना जिल्ह्याच्या हद्दीवर रोखण्यासाठी पावले उचलण्यात येतील. त्यांच्या लसीकरणाबाबत माहिती घेतल्यानंतरच त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येईल. तसेच स्थानिक जनावरांना लसीकरणासाठी विशेष पथके निर्माण करण्यात येतील. यात सुटलेल्या जनावरांचे लसीकरण करण्यात येईल. परराज्यातील जनावरांच्या संसर्गामुळे स्थानिक पशूंना हानी होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात येतील.
परराज्यातील जनावरांच्या रक्ताचे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात यावे. याचा अहवाल तातडीने मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यामुळे संसर्गजन्य आजारावर आळा बसू शकेल. तसेच मेंढपाळांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. यासोबतच अपघातात मेंढपाळांचा मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान, मेंढपाळावरील नोंदविण्यात आलेले गुन्हे, घरकुल योजनेचा लाभाबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. कटियार यांनी सांगितले.
00000
जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
अमरावती, दि. 06 (जिमाका) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी पहिले मराठी नियतकालिक दर्पण सुरू केल्यानिमित्ताने मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. यानुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयातील विजय राठोड, सागर राणे, साजिद शेख, राजश्री चौरपगार उपस्थित होते. उपस्थितांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
00000
स्वातंत्रसैनिक एकनाथ हिरुळकर यांचे निधन
अमरावती, दि. 6 (जिमाका) : शंकरनगर येथील विक्रम टॉवरमधील रहिवासी स्वातंत्रसैनिक एकनाथ माधवसा हिरुळकर, वय 100 यांचे दि. 4 जानेवारी 2025 रोजी निधन झाले. जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
एकनाथ हिरुळकर यांच्या पार्थिवावर दि. 5 जानेवारी 2025 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार रवी राणा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे आणि श्रीमती यावलीकर उपस्थित होते. हिरुळकर यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
00000
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा आज दौरा
अमरावती, दि. 6 ( जिमाका):- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे आज सोमवार, दि. 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 8 वाजता अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे ओबीसी शिष्टमंडळासोबत बैठक घेतील. रात्री 10 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रस्थान करतील.
00000
No comments:
Post a Comment