Friday, January 24, 2025

DIO NEWS AMRAVATI 24.01.2025

 राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांचा दौरा

अमरावती, दि. 24 : सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, मृद व जलसंधारण, आदिवासी विकास व पर्यटन राज्यमंत्री इंद्रनिल नाईक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, राज्यमंत्री श्री. नाईक यांचे शनिवार, दि. 25 जानेवारी रात्री 9 वाजता अमरावती येथील सर्कीट हाऊस येथे आगमन होईल. रविवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.10 वाजता जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता अमरावती येथून पुसदकडे रवाना होतील.

 

00000











घर घर संविधान अंतर्गत समाज कल्याण विभागाचा उपक्रम

संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन, बाईक रॅली

अमरावती, दि. 24 (जिमाका) : भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून ‘घर घर संविधान’ उपक्रम सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज सकाळी इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पुष्पहार अर्पण करून व अभिवादन केले. सर्व मान्यवर व उपस्थितांनी यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. तसेच उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ देण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, सहायक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर तसेच विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

घर घर संविधान  दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग व अन्य शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बाईक रॅलीचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी हवेत फुगे सोडून रॅलीला सुरवात करण्यात आली.

भारतीय राज्यघटने बाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्य शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावीत, यासाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक सर्व प्रकारचे व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा ,शासन मान्यता प्राप्त अनुदानित, अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्य, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी घर घर संविधान हा उपक्रम राबवण्यात येत  आहे.

बाईक रॅलीच्या समारोप प्रसंगी संविधान मसुदा समितीचे सदस्य डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले.यावेळी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचे सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी मानले.

 

00000

                    राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाला  28 जानेवरीला प्रारंभ

 अमरावती, दि. 24 (जिमाका) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  52 व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2024-25 चे आयोजन दिनांक 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे होणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन बुधवार, दि.29 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावर्षी हे प्रदर्शन अमरावती जिल्ह्याने आयोजित केले असून, राज्यातील सर्व जिल्ह्यातून 800 विद्यार्थी आणि शिक्षक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. तसेच, शिक्षण मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार, प्रत्येक जिल्ह्यातून दररोज हजार विद्यार्थी आणि शिक्षक या प्रदर्शनास भेट देणार आहेत.  विद्यार्थी, शिक्षक आपल्या वैज्ञानिक प्रतिकृती, नवनिर्मितीचे प्रदर्शन यावेळी घडविणार आहे. यासाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक यांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन  राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. हर्षलता बुराडे यांनी केले आहे.

0000


आता कृषि योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक

*सीएससी केंद्रावर काढता येणार ओळख क्रमांक

*जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यास मान्यता

अमरावती, दि. 24 : जिल्ह्यात केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शासनाच्या सर्व योजनांचे लाभ आणि सहभाग मिळविण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक मिळविणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रातून शेतकरी ओळख क्रमांक काढावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून कृषि क्षेत्रातील डेटा आणि डिजीटल सेवांच्या उपयोगाने शासनाच्या विविध योजना लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यत पोहोचण्यात येणार आहे. अॅग्रीस्टॅक अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक देण्याची सुविधा नागरी सुविधा केंद्रात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रात सातबारा, आठ अ आणि आधार क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईलसह संपर्क साधणे आवश्यक आहे. नोंदणी करताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी येणार आहे. ओटीपी नमूद केल्यानंतरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नोंदणी झाल्यावर शेतकरी ओळख क्रमांक त्याच मोबईल क्रमांकावर प्राप्त होणार आहे.

शेतकरी ओळख क्रमांक अत्यंत महत्वाचा असून शेतकऱ्‍यांनी जपून ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ शेतकरी ओळख क्रमांकानुसार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. भविष्यातील प्रत्येक योजनेमध्ये सहभागी अथवा लाभ मिळविण्याकरीता शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे.

कृषि क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण योजना योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत जलद गतीने पोहचवून कृषि क्षेत्राचा विकासासाठी अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने शेतकरी ओळख क्रमांक काढावा, अडचण आल्यास गावाच्या तलाठ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

अमरावती, दि. 24 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यात सुमारे सहा हजार 174 अर्ज महाविद्यालय आणि विद्यार्थीस्तरावर प्रलंबित आहेत. सदर अर्ज तातडीने निकाली काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येतात. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी नवीन अर्ज  व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याकरिता दि. 25 जुलै 2024 पासून सुरूवात झाली. सन 2023-24 वर्षाचे महाडीबीटीनुसार जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावर शिष्यवृत्तीचे 5 हजार 518 अर्ज, तर विद्यार्थीस्तर 656 अर्ज प्रलंबित आहेत.

            मागील वर्षी 2023-24 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 20 हजार 521 अर्ज नोंदणीकृत झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सर्व योजनाचे सुमारे 14 हजार 800 विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीकृत झाले आहे. या अर्जापैकी विद्यार्थीस्तरावर 656 व महाविद्यालय स्तरावर 5 हजार 518 अर्ज प्रलंबित आहेत.

            जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्राचार्यांनी महाविद्यालयास्तरावरील प्रलंबित पात्र अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावे. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉ‍गीनकडे त्रृटी पूर्ततेसाठी परत केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत पुर्तता करून अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.  

00000

उच्च शिक्षणातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

            अमरावती, दि. 24 (जिमाका) : देशातील नामांकीत शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून सन 2024-25 वर्षासाठी अर्ज करण्यास 14 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शैक्षणिक संस्थामधील सन 2024-25 मधील प्रवेश प्रक्रीया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह दि. 14 फेब्रुवारीपर्यंत समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे -411 001 येथे सादर करावे. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...