Wednesday, January 22, 2025

DIO NEWS AMRAVATI 22.01.2025

 प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत बदल; नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 22 (जिमाका) : प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी असून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील लहान मुले, पालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाहनांची रस्त्यावर फार वर्दळ असणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत अंशत: बदल करण्यात आले आहेत.

रविवारी, सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शहरातील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद राहतील. त्यात मालवाहू, हलकी व जडवाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंद राहील. शहरातील उड्डाणपूल, गाडगेनगर, समाधी मंदीरापासून ते जिल्हा स्टेडियम येथील उड्डाणपूल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन, कुथे हॉस्पीटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावरून दि. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनाना प्रवेश बंदी राहणार आहे. याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त यांनी मुंबई पोलीस कायदा 1951चे कलम 33 (1) (ब), तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार आदेश निर्गमीत केला आहे.

0000

जिल्ह्यात 31 जानेवारीपासून कुष्ठरुग्ण शोध अभियान

अमरावती, दि. 22 (जिमाका) : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात  दि. 31 जानेवारी  ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या नियोजनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा पार पडली.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी कुष्ठरुग्ण शोध अभियानामध्ये आशा कर्मचारी व पुरुष स्वयंसेवकांनी घरांना भेटी देवून सर्व सदस्यांची कुष्ठरोगाबाबत तपासणी करावी. तसेच अभियानाच्या यशस्वीता आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी संपूर्ण कार्यक्षेत्रात पुरेशा प्रमाणात जनजागृती करावी, तसेच इतर शिक्षण, समाजकल्याण, स्वयंसेवी संस्था, परिवहन, लायंस क्लब, रोटरी क्लब यांनी कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सभेसाठी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. संदिप हेडावू, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारीसे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनंती नवरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. जुबेर अली, कोठारा लेप्रसी हॉस्पीटलचे मिलींद चांदेकर, तपोवनचे सचिव सहदेव गोळे, स्वयंसेवी संस्था निंभोराच्या रेन्सी फान्सीस, समाज कल्याण विभागाचे श्री. शाह, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार दासरवाड, लायन्स क्लबचे रविंद्र उघडे, बबन वैराळे, रोटरी इंद्रपुरीचे पवन लढ्ढा आदी उपस्थित होते.

डॉ. पूनम मोहोकार यांनी प्रास्ताविक केले. गजानन पन्हाळे यांनी आभार मानले.

0000

राष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त सुकन्या समृद्धी खाते मोहीम

अमरावती, दि. 22 (जिमाका): राष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने अमरावती डाक विभागातर्फे सुकन्या समृद्धी योजनेसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत 10 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील डाक कर्मचारी शाळा, अंगणवाडी, तसेच घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुकन्या समृद्धी खाते महत्त्वाचा उपक्रम आहे. पालकांनी आपल्या मुलीचे खाते उघडावे, असे आवाहन डाकघरचे प्रवर अधीक्षक गजेंद्र जाधव यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...