युवा सप्ताह 12 ते 19 जानेवारी दरम्यान
अमरावती, दि. 10 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व एकलव्य गुरुकुल स्कुल, नांदगाव खंडेश्वर तसेच विविध शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजन 12 ते 19 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस दि. 12 जानेवारी देशभर राष्ट्रीय युवा दिन म्हणुन साजरा केला जातो. युवकांचा सर्वांगिण विकास करणे आणि राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभागी होणे याकरीता युवकांना उद्युक्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच राज्यामध्ये राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचा जन्मदिन याच दिवशी म्हणून साजरा केला जातो. या अंतर्गत युवा सप्ताह अंतर्गत रविवार, दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वामी विवेकानंदाचे कार्य, तत्वज्ञान, विचार यावर युवकांना प्रबोधन करण्यात येणार आहे. दि. 13 जानेवारी रोजी नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य गुरुकुल स्कुल येथे निबंध स्पर्धा, दि. 14 जानेवारी रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे शुभम सोनोने हे युवकांना नोकरी, व्यवसाय, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन करणार आहेत. दि. 15 जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा, दि.16 जानेवारी रोजी यशस्वी व्यक्तीचे अनुभव कथन, दि. 17 जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा, दि.18 जानेवारी रोजी पर्यावरण मार्गदर्शन, नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य गुरुकुल स्कुलचे विलास मारोतकर करणार आहेत. दि.19 जानेवारी 2025 रोजी युवा दिन युवा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमाचे समारोप कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. युवा सप्ताह कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमास सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment