Thursday, January 23, 2025

DIO NEWS AMRAVATI 23.01.2025

 






ड्रोनचे प्रशिक्षण विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणार

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

*भातुकली येथे किसान ड्रोनचे प्रात्यक्षिक

अमरावती, दि. 23 (जिमाका) : जिल्हा कौशल्य व उद्योजकता विभागातर्फे ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. युवकांना या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. सध्या शासनही विविध कामांसाठी ड्रोनचा उपयोग करीत असल्याले ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे, असे मत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले.

भातकुली येथे स्वराज फाऊंडेशनच्या वतीने ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, तहसिलदार अजितकुमार येळे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती भोसले, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती बोरेकर आदी उपस्थित होते.

श्री. कटियार यांनी, किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजनेतून प्रशिक्षणाच्या योजनेसाठी एक कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून जिल्ह्याभरात 10 प्रशिक्षण संस्था कौशल्य प्रशिक्षण राबवित आहे. यामध्ये 27 प्रशिक्षण तुकड्यातून 810 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत, महिला ड्रोन प्रशिक्षण घेणार असल्याने त्यांचे सक्षमीकरणही होणार आहे. शेतीमध्ये ड्रोनच्या उपयोगाबाबत ग्रामीण भागात शंका आहे, त्यामुळे त्यांच्या शंकांचे निरासन हे ड्रोनची उपयोगिता सिद्ध करून दाखवावे लागणार आहे.

गेल्या काळात स्वामित्व योजनेत गावातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात आला. पोलिस, रेल्वे, वीज पुरवठा आदी क्षेत्रात ड्रोनचा सक्षमपणे उपयोग करण्यात येत आहे. सर्व घटकांसाठी मोफत असलेले प्रशिक्षण घेऊन युवकांनी कृषि विभागातर्फे असलेल्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी योवळी केले.

भातकुली तालुक्यामध्ये स्वराज एज्युकेशन सेंटर संस्थेतर्फै ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये उपयुक्त किसान ड्रोन ऑपरेटर अभ्यासक्रमासाठी 90 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे. यात 52 महिलांचा सहभाग आहे. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींना सदर योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. सुरवातीला किसान ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ड्रोनच्या जनजागृतीबाबत पथपाट्य सादर केले.

सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणार्थी जयश्री खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. संप्रदा डाखरे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय डाखरे यांनी आभार मानले.

 000000




जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेत विविध खेळ स्पर्धेचे आयोजन

 अमरावती, दि. 23 (जिमाका): जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव खंडेश्वर येथे विविध खेळ स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष भूपेंद्र जेवडे, नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक स्नेहल बासुतकर, स्वराज्य प्रशासकीय अकादमीचे राहुल हजारे, प्रतीक कोल्हे, गजानन शेळके, दर्शन मारोटकर उपस्थित होते.

          खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनात व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळांमुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. सांघिक खेळ खेळल्यामुळे सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो, असे प्रतिपादन श्री. जेवडे यांनी यावेळी केले.

 कबड्डी, खो-खो, 100 मीटर धावणे स्पर्धा, गोला फेक, खो-खो अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेता संघाला प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक तसेच वैयक्तिकता खेळाडूंना प्रथम क्रमांक, द्वितीय  क्रमांक  पारितोषिक  म्हणून नेहरू युवा केंद्र, माय भारत ,अमरावती, युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत शिल्ड देण्यात आले.  या खेळासाठी नांदगाव तालुक्यातील विविध मंडळांनी व खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

0000

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

अमरावती, दि. 23 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह -02) नुकताच अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 210 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

या मेळाव्यात जाधव गेअर्स प्रा. लि., सत्या मायक्रो कॅपिटल लि., ई. सी. ई. इंडिया प्रा.लि, दामोदर इंडस्ट्रीस प्रा. लि., डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, श्री. शिवाजी बहुउद्येशीय महाविद्यालय, विदर्भ आयुर्वेदीक महाविद्यालय, जिनस इंन्फ्रास्ट्रक्चर लि. इत्यादी खाजगी आस्थापनेच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

या मेळाव्यात 172 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आणि त्यापैकी 82 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0000


जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे

यांची जयंती साजरी

            अमरावती, दि. 23 (जिमाका) : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार  यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी  शिवाजी शिंदे यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

00000

  

जिल्हा क्रीडा गुणवंत पुरस्कारांचे प्रजासत्ताक दिनी वितरण

            अमरावती, दि. 23 (जिमाका): राज्य शासनाच्या वतीने सन 2023-24 साठी जिल्हा पुरस्कारासाठी जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच जिल्ह्यातील खेळाडूंचा गौरव व्हावा व क्रीडा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना  प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2025 रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती यांचे प्रांगणात उद्योग राज्य मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी दहा हजार रूपये,  स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रा. डॉ. योगेश सुरेशराव निर्मळ (जलतरण)यांना देण्यात येईल. डॉ. योगेश निर्मळ यांनी जलतरण या खेळाचे खेळाडू जिल्हास्तर ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घडविले. यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नॅशनल गेम्स, सिनिअर व ज्युनिअर राष्ट्रीय व राज्यस्तरीय अजिंक्यपद  स्तरावर खेळाडूंना मार्गदर्शन केले.

थेट पुरस्कारार्थी- हिमांशु प्रविण जैन (जिमनॅस्टीक) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.  हिमांशु जैन यांनी जिमनॅस्टीक या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 2023 रोजी ताश्कंत (उजबेगीस्तान) येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करुन व्दितीय क्रमांक प्राप्त केला. हिमांशु यांनी अनेक राज्यस्तर ते राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त केली आहेत.

 गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरुष सौरभ संतोष टोकसे (सॉफ्टबॉल) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.  सौरभ टोकसे यांनी शालेय, राष्ट्रीयस्तर क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर वरिष्ठ गटातील क्रीडा स्पर्धा गुजरात, संभाजी नगर, आंध्र प्रदेश, ओडीसा, श्रीनगर तसेच विविध राज्यस्तर स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केले आहे. गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला वैष्णवी देविदास बांडाबुचे (वुशु) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. वैष्णवी यांनी वुशु या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर वरिष्ठ, कनिष्ठ गट स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगीरी करुन प्राविण्य प्राप्त केले आहे.

जिल्हा गुणवंत क्रीडा विशेष पुरस्कार- प्रविण दादाराव आखरे, पोलीस हवालदार (योगासन) यांना देण्यात येणार आहे. श्री. आखरे पोलीस दलात कार्यरत असून योगासन या प्रकारात इंडिया व एशिया बुकमध्ये  यांचा साहसी उपक्रम नोंदविला आहे.

 

                                                                 00000

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 23.06.2025

                                                                        शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत *जिल्हा परिषदेच्या...