Tuesday, January 28, 2025

DIO NEWS AMRAVATI 28.01.2025


 

हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मानित

        अमरावती, दि. 28 (जिमाका): सहायक संचालक नगर रचना मूल्यांकन कार्यालयात कार्यरत नगर रचनाकार प्रविण पेटे यांची ‘स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार दि. 31 जानेवारी रोजी पुणे येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

00000


प्रजासत्ताक दिनी कुष्ठरोग जनजागृतीपर प्रतिज्ञा

अमरावती, दि. 28 (जिमाका): प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावती जिल्हा अंतर्गत शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सर्व संस्था, शाळा, महाविद्यालय, कार्यालय इत्यादी ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुष्ठरोग जनजागृती पर प्रतिज्ञा  यावेळी घेण्यात आली. शासकीय कर्मचारी, अशासकीय कर्मचारी, खाजगी व्यावसायिक तसेच नागरिकांनी कुष्ठरोग प्रतिज्ञेचे वाचन केलेले आहे.

संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला समान संधी, समान हक्क, समान अधिकार आहेत. कुष्ठरुग्णांना समानतेची वागणूक देण्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. लवकर निदान, लवकर उपचार आणि बहुविध औषधोपचार हाच या आजारावर उपाय असून सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध आहेत. अशी माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहायक संचालक डॉ.पूनम मोहोकार यांनी दिली.

0000



स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान  जिल्हा समन्वय समिती सभा संपन्न

अमरावती, दि. 28 (जिमाका):  राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा कार्यक्षेत्रामध्ये दि. 31 जानेवारी  ते दि. 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा नुकतीच पार पडली.

स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान विशेष मोहीम राबविण्यासाठी व संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांनी समन्वयाने कार्य करावे. तसेच हे अभियान राबविण्यासाठी अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य यांनी कुष्ठरोग जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करावी, असे आवाहन  श्रीमती संजिता महोपात्र यांनी केले आहे.

स्पर्श कुष्ठरोग शोध अभियान विशेष मोहीम राबविण्यासाठी गावनिहाय, वार्डनिहाय नियोजन करण्यात आले आहे. यावेळी आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी हे घरोघरी प्रत्यक्ष भेटी देवून सर्वेक्षण करणार आहेत. कुष्ठरोग लक्षणे असणाऱ्या संशयितांची नोंद घेऊन पुढील तपासणी, निदान निश्चिती व त्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी बहुविध औषधोपचार करणार असल्याबाबतची माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहायक संचालक डॉ.पूनम मोहोकार यांनी दिली.

निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रविण पारिसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. जोगी, डॉ. विशाल काळे, तपोवन, कोठारा, निंभोरा येथील अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे प्रतिनिधी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, नर्सिंग कॉलेज व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच कुष्ठरोग विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

00000

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवारी दौरा

अमरावती, दि. 28 (जिमाका) : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 31 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे यांचे शुक्रवारी सकाळी 10 वाजता श्री अंबादेवी मंदिर येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता मिट द प्रेस होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 वाजता जिल्हा विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी 3 वाजता विभागीय आयुक्त यांचे सादरीकरण आणि आढावा, दुपारी 4.30 वाजता नोंदणी उपमहानिरीक्षक यांचे सादरीकरण व आढावा, सायंकाळी 5.15 वाजता भूमी अभिलेख उपसंचालक यांचे सादरीकरण व आढावा घेतील. रात्री 8 वाजता गृहभेटी आणि त्यानंतर रात्री 10 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रस्थान करतील.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...