प्रजासत्ताक दिनासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सूचना
प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा आढावा
अमरावती, दि. 7 : जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे प्रजासत्ताक दिनी मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भटकर यांनी, ध्वजवंदनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करावीत. प्रामुख्याने मैदान स्वच्छता आणि पोलिस कवायतीसाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यात याव्यात. ध्वजवंदनानंतर सादर करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाने शाळांशी समन्वय साधावा. मैदानावर प्रामुख्याने स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय महापालिकेतर्फे करण्यात यावी. पोलिस विभागाने ध्वजवंदनासाठी आवश्यक असणारी सामुग्री आणि कवायतीची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला भातकुलीच्या उपविभागीय अधिकारी पी. एम. मिन्नू, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जून ठोसरे, तहसिलदार विजय लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
000000
एचएमपीव्हीबाबत सूचनांचे नागरीकांनी पालन करावे
*आरोग्य विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 7 (जिमाका) : चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी दक्षता बाळगावी, तसेच आरोग्य विभागातर्फे एचएमपीव्हीबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलॅंडमध्ये 2001 मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस सामान्य श्वसन विषाणू आहे. या विषाणूमुळे श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या आजारास कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यत: आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. याबाबत डीजीएचएस आणि संचालक, एनसीडीसी, दिल्ली यांनी दि. 3 जानेवारी 2025 रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झाली नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केले आहे.
आजारापासून बचाव करण्यासाठी खोकला किंवा शिंका येत असल्यास तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवावे. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहावे. भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक अन्न खावे. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच हस्तांदोलन करू नये. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करावा. आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे, अशा सूचना करण्यात आल्या आहे.
चीनमधून आलेला नवीन विषाणू मानवी मेटान्यूमोव्हायरस अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे. नागरिकांनी नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापि या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला अर्थात आयएलआय, सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
00000
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांचा दौरा
अमरावती, दि. 7 ( जिमाका) : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान हे दि. 9 जानेवारी रोजी अमरावती येथे दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींसोबत भेट घेतील. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीला उपस्थित राहतील. सायंकाळी 4 वाजता अमरावती येथून अकोलाकरीता प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment