Thursday, May 1, 2025

६६ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 

























शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा

६६ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 

अमरावती , दि. १ (जिमाका ) : शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत.  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

 

        महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने  पोलीस मुख्यालय, अमरावती शहर परेड मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे बोलत होते. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

नागरिकांना मार्गदर्शन करण्यापूर्वी श्री. भुसे यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री. भुसे म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी  शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून आतापर्यंत पावणे तीन लाख शेतकऱ्यांना १ कोटी ६५ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून ८६ शेतकऱ्यांना १ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

 

        राज्य शासनाने पारदर्शी आणि गतिमानतेचे धोरण स्वीकारले आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचे समाधान शिबिर राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाने 'संवाद' हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हा प्लॅटफॉर्म नागरिकांना समस्या मांडण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. जिल्हा प्रशासनाला 'मिशन 28 मेळघाट ' आणि महिला व बाल संरक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. अमरावतीच्या विकासासाठी विमानतळ सुरू झाले आहे. याशिवाय या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरात वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करून यावर्षीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा विहित वेळेत मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व शासकीय सेवा ऑनलाईन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सध्या सेवा हमी विधेयकाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

 

सौर ऊर्जा प्रकल्पांवर भर देण्यात येत आहे.  प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेत जिल्ह्यात १० हजार २७३ ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे ४३.७३ मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता निर्माण झाली आहे.

राज्यात नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कार्यवाही करत, राज्य अभ्यासक्रमात सीबीएसईच्या चांगल्या गोष्टींचा समावेश केला जाणार आहे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले.

  

 

पुरस्कार वितरण सोहळा

 

        विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . श्रुतिका औगड व उन्नती ओगले ( गोल्डन ॲरो चाचणी परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल), अक्षय पंत (प्रामाणिकपणा व सचोटी ), योगेश ठाकरे (फायरमन), सय्यद अन्वर सै अकबर (लीडिंग फायरमन), प्रीती ठाकरे ( अवैध गौण खनिज विरुद्ध कार्यवाही), पोलीस आयुक्तालयातील दिनेश नेमाडे, अली खुर्शीद अली सय्यद, विनोद सिंग चव्हाण, संगीता सिरसाम यांना उत्कृष्ट कार्याबाबत गौरविण्यात आले.

 

        प्रारंभी विविध शासकीय विभागामार्फत परेड संचलन करण्यात आले. मंत्री श्री. भुसे यांनी परेड संचलनाचे निरीक्षण केले.  परेडचे संचलन परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, राखीव पोलीस निरीक्षक श्रीधर गुळसुदरे यांनी केले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले.

 

मुख्यमंत्री सहायता कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत आणि मदत कक्षाचे उद्घाटन

 

         मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत आणि मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांना मदत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या सहायाची माहिती देण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...