Tuesday, May 13, 2025

DIO NEWS AMRAVATI 13-05-2025

 

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा दौरा

अमरावती, दि. 13 : राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 14 मे रोजी सकाळी 10.30 वाजता अंबादेवीचे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मैला उचलणाऱ्या आणि गटार साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यास प्रतिबंध व पुनर्वसन, तसेच अधिनियम २०१३ च्या अंमलबजावणी व सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा होणार आहे.

दुपारी 2.30 वाजता अमरावती महानगरपालिका कार्यालयात आयुक्तांसोबत बैठक घेणार आहेत. यावेळी 'नमस्ते' नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम या योजनेत जिल्ह्यातील अंमलबजावणी करणे आणि त्याबाबतचा आढावा घेतील. सायंकाळी 4.30 वाजता स्थानिक संघटनांचे कार्यालय व सफाई कामगारांच्या वस्तीला भेट देतील. सायंकाळी 5 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

कुसुम सौर कृषीपंप योजनेतील अर्जदारांनी हिस्सा भरण्याचे आवाहन

अमरावती, दि. 13 : कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू आहे. या योजनेतील प्रलंबित असलेल्या अर्जदारांनी हिस्साची रक्कम भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत दिवसा सिंचनाची सोय होणार आहे. शेतकऱ्यांना 3 ते 7.5 अश्वशक्तीचे सौर पंप उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्वसाधारण वर्गवारीतील लाभार्थ्यांसाठी कृषी पंपाच्या किंमतीच्या 10 टक्के, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांसाठी केवळ 5 टक्के हिस्सा भरायचा आहे. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिले जाणार आहे.

जिल्ह्यात 2 हजार 685 शेतकऱ्यांनी ऑनलाईन कोटेशन भरले आहे. 2 हजार 74 शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरला आहे. प्रत्यक्षात 1 हजार 566 सौर पंप आस्थापित करण्यात आले आहेत. संयुक्त सर्वेक्षणात 175 अर्ज रद्द झाले आहेत. अद्यापही 611 शेतकऱ्यांचा लाभार्थी हिस्सा भरणे प्रलंबित आहे.

योजनेसाठी शेतकऱ्याकडे विहीर, बोरवेल, शेततळे किंवा बारमाही जलस्रोत असणे आवश्यक. तसेच पारंपरिक वीज जोडणी नसलेले शेतकरी पात्र आहेत. अटल सौर कृषी पंप योजना-1 आणि 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा, असे लाभार्थी निवडण्याचे निकष आहेत.

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, तसेच लाभार्थी हिस्सा तातडीने भरावा, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

00000

  

‘ऑपरेशन अभ्यास’मधून आपत्कालीन परिस्थितीची तयारी

अमरावती, दि. 13 : राष्ट्रीय छात्र सेनेच्या 3 महाराष्ट्र सिग्नल कंपनी एनसीसीतर्फे मंगळवारी, दि. 13 मे रोजी ‘ऑपरेशन अभ्यास’ राष्ट्रव्यापी मॉक ड्रिल घेण्यात आली. यातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये जागरूकता, तयारी आणि त्वरीत प्रतिसादाचा सराव करण्यात आला.

या मॉक ड्रिलमध्ये एअर-रेड वॉर्निंग सायरन वाजवणे, असुरक्षित भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रात्यक्षिक करणे, ड्रिलमध्ये नेतृत्व करणे आणि इतरांना प्रमाणित कार्यपद्धतीनुसार मार्गदर्शन करण्‍याचा समावेश करण्यात आला. तसेच अति जोखिमीची परिस्थिती, हवाई हल्ल्यादरम्यान करावयाची कृतीचे प्रशिक्षण आणि अनुभव कॅडेट्सनी घेतला. याव्यतिरिक्त जिल्हा प्रशासन, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांसोबत समन्वय साधून एनसीसी कॅडेट्सनी आपत्कालीन परिस्थितीत एकत्रितपणे काम करण्याची तयारी दर्शविली.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...