पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांबाबत आढावा








                    अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
                   आवश्यक कामांसाठी निधी मिळवून देऊ
-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 20 : जिल्ह्यात विविध विकास आराखड्यातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. आवश्यक व नव्या कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून अतिरिक्त निधी मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. 
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या स्थळांचा विकास विविध प्रकल्पांच्या उभारणीतून होत आहे. आराखड्यानुसार  आधी अपूर्ण कामे पूर्णत्वास न्यावीत. नव्या कामांसाठी अतिरिक्त निधी शासन स्तरावर पाठपुरावा करून मिळवून देण्यात येईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी विकास आराखडा एकूण 150 कोटी 83 लाख रुपयांचा आहे. सुमारे 142 कोटी निधी वितरित करण्यात आला असून, विविध विकास कामे होत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  वास्तव्याने पुनित वास्तूंचे जतन व संवर्धन करताना परिसरात नव्या सुविधांची निर्मिती  आराखड्यात अंतर्भूत आहे. त्यानुसार भक्तनिवास, बहुउद्देशीय सभागृह, तलाव सौंदर्यीकरण, काँक्रीट रस्ते, हायमास्ट पोल, ग्रामविकास प्रबोधिनी आदी कामांचा समावेश आहे. तिवसा क्रीडा संकुल, क्लब हाऊस, स्विमिंग पूल आदी कामांना गती द्यावी. आवश्यक कामांसाठी आमदार फंडातूनही काही निधी देण्यात येईल. 
तिवसा येथे उपजिल्हा रुग्णालयाबाबत प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यात ३७.८६ कोटी निधीतून  विविध कामे होत आहेत. त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर विकास आराखड्यात रिंगण सोहळा, काँक्रिट छत्री, नदी घाटाचे बांधकामे आदी कामे पूर्णत्वास जात असून, पर्यटक निवास, प्रसाधनगृह, उपाहारगृह आदी कामे तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. उपलब्ध निधीतून अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
            बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग,सार्वजनिक आरोग्य विभाग, नियोजन विभाग यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती