पालकमंत्र्यांची पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा





तूर खरेदीसाठी लागवडीचे पूर्ण क्षेत्र धरून उत्पादकता निश्चित करावी
- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 8 : तूर खरेदी करताना आंतरपीक म्हणून अर्धे क्षेत्र न धरता तूरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र धरून उत्पादकता निश्चित करावी व त्यानुसार खरेदी करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांना दुरध्वनीवरून चर्चा करताना दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
तूरीचे पीक आंतरपीक म्हणून घेतले जात असले तरी तूर खरेदीसाठी तूरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र ग्राह्य धरून उत्पादकता निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानुसार खरेदी व्हावी. याविषयी पाठपुरावा करण्यात येईल, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश म्हसे तसेच कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली. त्यानुसार दोन दिवसात याबाबत पत्र निर्गमित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीत पालकमंत्र्यांनी पाणी टंचाई उपाययोजना, पाणी पुरवठा तसेच विभागीय स्तरावरील कार्यालयांसाठी नियोजित इमारत आदी विविध बाबींच्या अनुषंगाने चर्चा केली. भविष्यात पाणी टंचाईची संभाव्यता लक्षात घेता टँकर आदी सुविधांचे परिपूर्ण नियोजन करावे. पाणी पुरवठा योजनांबाबत तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे. आवश्यक तेथे सर्व्हेक्षण करुन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
केकतपूर येथे स्थलांतरीत पक्षी येण्याचे प्रमाण मोठे आहे. याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी केकतपूर सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार कार्यवाही व्हावी असेही त्यांनी सांगितले. तिवसा येथील वनउद्यान व इतर विषयांवरही यावेळी चर्चा झाली.
00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती