अचलपूर येथे उभारणार दूध संकलन-विक्री केंद्र



दूध संकलन केंद्राचा प्रकल्प अहवाल तयार करा
                                     -राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 13 : दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी अचलपूर उपविभागीय कार्यालयाच्या नजीक असलेल्या ई-क्लास भुखंडावर शेतकऱ्यांसाठी दूध संकलन केंद्र उभारण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून दूध संकलन, विक्रीसह दूध प्रकिया उद्योगाचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना दिल्या जाईल, अशा पध्दतीचे सुरळीत नियोजन करुन प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिले.
            येथील सिंचन भवन विश्रामगृहात पशुसंवर्धन दुग्ध विकास व्यवसाय वाढीसाठी नियोजन संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. राधेश्याम बहाद्दुरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. राऊत यांच्यासह दुग्ध विकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन द्यायावयाचे असल्यास दूध उत्पादन खर्च कमी होणे आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीक्षेत्र व अपुऱ्या सिंचनामुळे शेतकऱ्यांना पशुंसाठी लागणारा चारा निर्मितीकरीता अडचण येते. अशा स्थितीत शाश्वत सिंचन व्यवस्था होऊन उत्तम प्रतीचे चारा व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने मुरग्रास व इतर पशुखाद्य निर्मितीवर भर दिला पाहिजे.  या अनुषंगाने शासनाच्या ई क्लास जमीनीवर चारा निर्मितीसाठी जमीनी ताब्यात घेऊन त्यावर चारा निर्मिती करावी.  
दुधाळ जनावरांना पुरेसे पशुखाद्य उपलब्ध होईल यासाठी बारा महिन्याचे पशुखाद्य व औषधीचे वेळेनुसार नियोजित आराखडा तयार करावे. सर्व ऋुतूमध्ये पशुसाठी चारा उपलब्ध होईल यादृष्टीने वैरण व्यवस्था भक्कम झाली पाहिजे. पशु खाद्यानचे मासिक विवरणपत्र तयार करुन त्यानुसार चाऱ्या निर्मितीचे नियोजन करावे. दुधाळ पशुंना कुठल्या महिन्यात रोग अधिक बळवतात व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय कसा करावा, याची माहिती गोळा करावी. शेतकरी आत्महत्या रोखण्यामध्ये दुग्ध उत्पादनांची वाढ प्रभावी उपाय ठरु शकते. येत्या 22 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत प्रकल्प अहवाल व अनुषंगिक बाबीचे सादरीकरणासाठी आवश्यक माहिती गोळा करावी, असेही श्री. कडू यावेळी सांगितले.
           सुरुवातीला चांदुरबाजार व अचलपूर तालुक्यात दूध संकलन व विक्री केंद्र हा पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रकल्प राबवावा. दूध संकलन व विक्री केंद्राच्या उभारणीनंतर येणाऱ्या कमतरता, अडचणी तसेच फायदे-तोटे जाणून घेतल्यावर हा प्रयोग राज्यभरात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार. दूध विक्री तसेच प्रक्रिया उद्योग व दूधापासून तयार होणाऱ्या पदार्थांवर नफा किती मिळतो याची आकडेवारी घ्यावी. त्यानुसार शेतकऱ्यांना केंद्रात दूध विक्रीचे फायदे व तोटे आदी संदर्भात मार्गदर्शन करावे, असेही श्री. कडू यांनी सांगितले.
जिल्ह्यातून दर दिवशी 29 हजार लीटर दूध संकलीत होऊन नागपूर राष्ट्रीय दुग्ध विकास प्रक्लपाला जाते. यातून दर दिवसाला 10 लाख 15 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असल्याची माहिती पदूम उपायुक्त डॉ. गोहत्रे यांनी बैठकीत दिली. शेतकऱ्यांचे दूध उत्पादन खर्च कमी करणे, बाराही महिने दुधाळ पशुंसाठी चाऱ्याची व्यवस्था, विपणन (मार्केटींग) सुविधा, प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण आदी संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती