राहुटी उपक्रमाद्वारे नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू









अमरावती, दि. १४ : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. अचलपूर तालुक्यात आज आयोजित राहुटी उपक्रमाचा आज शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी स्वत: यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
आज सकाळी अचलपूर तालुक्यातील कविठा बु. ग्राम पंचायतीत, त्यानंतर मेघनाथपूर बसस्टॉप येथे राहुटी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
शिधापत्रिका, आधारकार्ड यासह विविध कागदपत्रांसाठीच्या अर्जांचा, तसेच विविध विभागांशी संबंधित अडचणींचा निपटारा राहुटी उपक्रमातून होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून विविध गावांत हा उपक्रम सुरू असून, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. सर्व कार्यालयांचा राहुटी उपक्रमात सहभाग असून, विविध विभागांबाबतच्या तक्रारींचे निवारण एकाच छताखाली होत आहे.
मेघनाथपूर येथे आयोजित राहुटीत वासणी प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने अर्ज भरुन घेण्यात आले.

राहुटी उपक्रमात नागरिकांना अर्ज उपलब्ध करून देणे, लेखन साहाय्य करण्यासाठी अर्ज वाटप व लेखन  कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. तलाठी कक्ष, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, दिव्यांग कक्ष, पाणी पुरवठा विभाग, विद्युत कक्ष, सामाजिक न्याय विभाग, कामगार कल्याण, सिंचन, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, महिला व बालविकास कक्ष आदी कक्षांचा उपक्रमात समावेश आहे.  या दालनांतून समस्यांच्या निराकरणासह विविध योजनांची माहितीही नागरिकांना दिली जात आहे. उपक्रमामुळे वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण आदी सर्वसामान्य नागरिकांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लागत आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती